साखर कारखान्यांसाठी पुण्यात २४ ला कार्यशाळा
पुणे – खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांचे पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी सहकार भारतीच्या वतीने येत्या २४ ऑगस्ट रोजी पुण्यात, साखर संकुल येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे पुणे विभाग प्रमुख गिरीश भवाळकर यांनी दिली.
सहकार भारती ही संस्था देशपातळीवर कार्यरत असून, तिच्या वतीने विविध संस्थांसाठी मेळावे, शिबिरे, कार्यशाळा, प्रशिक्षण असे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असतात. संस्थेच्या पुणे विभाग साखर कारखाना शाखेच्या वतीने ही कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे.
सहकारी व खासगी साखर कारखान्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, कार्यकारी संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, सरव्यवस्थापक यांच्यासाठी ही कार्यशाळा आहे.
साखर कारखान्यांचे आर्थिक सक्षमीकरण- धोरण या विषयावर माजी आयुक्त साखर तथा ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड व साखर कारखान्यांचे व्यावसायिक व्यवस्थापन या विषयावर महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.
त्या नंतर मुक्त संवाद होणार आहे. ज्या साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे वतीने पारितोषिके मिळाली आहेत, त्यांचा सन्मान महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांचे हस्ते करण्यात येणार आहे, असे भवाळकर यांनी सांगितले.
या कार्यशाळेत जास्तीत जास्त प्रतिनिधींनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे पुणे महानगर व जिल्हा साखर कारखाना प्रकोष्ठ प्रमुख साहेबराव खामकर यांनी केले आहे. उपस्थित प्रतिनिधींना संस्थेचे वतीने शासनमान्य प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे पुणे महानगर अध्यक्ष सीए दिनेश गांधी यांनी सांगितले. या वेळी महाराष्ट्र प्रदेश सह कोष औदुंबर नाईक उपस्थित होते.