उसाच्या ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू, एक गंभीर

देवदर्शनाला निघालेल्या तरुणांवर काळाचा घाला
जातेगाव (बीड): अमावस्येनिमित्त मारुतीच्या दर्शनासाठी दुचाकीवरून निघालेल्या दोन तरुणांना उसाच्या ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार झाला असून, दुसरा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात गेवराई तालुक्यातील जातेगाव फाटा येथे शनिवारी (दि. १७) दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडला.
अमर पंडितराव बापमारे (वय २६, रा. मंगरूळ २, ता. माजलगाव) असे मृताचे नाव असून, नाना उद्धव बापमारे हा तरुण या अपघातात गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव तालुक्यातील मंगरूळ येथील अमर आणि नाना हे दोघे मित्र अमावस्येनिमित्त बीड तालुक्यातील पेंडगाव येथील मारुतीच्या दर्शनासाठी दुचाकीवरून जात होते. जातेगाव फाटा परिसरात आले असता, माजलगावहून गढीकडे जाणाऱ्या उसाच्या ट्रकने (क्र. MH 11 AL 0518) त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की चालक अमर बापमारे याचा जागीच मृत्यू झाला. नाना बापमारे याच्या पायाला गंभीर दुखापत (फॅक्चर) झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती गणेश प्रकाश बापमारे यांनी तलवाडा पोलीस ठाण्यात दिली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. दर्शन पूर्ण होण्याआधीच तरुणावर काळाने झडप घातल्याने मंगरूळ परिसरात शोककळा पसरली आहे.






