..अन्यथा कारखानदारांच्या घरासमोर कांठाळ्या आंदोलन

सोलापूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या गतवर्षीच्या थकलेल्या एफआरपी आणि ऊस दर जाहीर करण्याबाबत स्थानिक शेतकरी संघटना आणि प्रशासनाने तसेच साखर आयुक्तांनी वारंवार सूचना देउनही सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार मात्र शेतऱ्यांना केराची टोपली दाखवताना दिसत आहे. यंदाचा हंगाम शासनाचे नियम व अटी धाब्यावर बसवून सुरु केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या थकित एफआरपीचे काय असा सवाल सातत्याने शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित करत आहेत. तर दुसरीकडे वारंवार निवेदन आणि अर्ज देवून ही कारखानदारांचे कान उघडत नसल्याने त्या कारखानदारांच्या घरासमोर कांठाळ्या उघडा आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा रयत क्रांती संघटनेच्या वतीने सुहास पाटील यांनी नुकताच दिला आहे.
एफआरपी त्वरित द्यावी आणि ऊसाचा दर तात्काळ जाहिर करावा
सोलापूर जिल्ह्यातील गळीत हंगामात सहभागी असलेल्या साखर कारखान्यांनी गतवर्षीची एफआरपी त्वरित द्यावी आणि चालू वर्षीचा ऊसाचा दर तात्काळ जाहिर करावा, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहेत. येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत साखर कारखानदार एफआरपीसह अधिकचे दर जाहीर करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. नुकतीच या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.
या बैठकीला युटोपियन शुगर्स लिमिटेड, आवताडे शुगर लिमिटेड, विठ्ठल सहकारी साखर कारखाना गुरसाळे, श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लिमिटेड युनिट नंबर एक, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लिमिटेड युनिट नंबर दोन, श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर आदी कारखान्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. बैठकीला जे कारखानदार अनुपस्थित होते त्यांची बैठक सोमवारी १७ नोव्हेंबर रोजी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.





