पांडुरंग कारखान्याचे ऊस उत्पादकांसाठीचे पुरस्कार जाहीर

प्रमोद नाईकनवरे यांना ‘पांडुरंग ऊस भूषण पुरस्कार’
पंढरपूर : श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दिल्या जाणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘पांडुरंग ऊस भूषण’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. २०२३-२४ गळीत हंगामासाठी प्रमोद नाईकनवरे हे ‘पांडुरंग ऊस भूषण’ ठरले आहेत.
सभासद शेतकऱ्यांमधून निवड करून “पांडुरंग ऊस भुषण” हा पुरस्कार देऊन त्यांचा सपत्निक सन्मान करण्यात येतो. रुपये 1,01,111/- रोख स्मृती, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे..
गळीत हंगाम 2023-24 चे “पांडुरंग ऊस भुषण” पुरस्कार विजेते ठरले आहेत भोसेचे शेतकरी प्रमोद किसन नाईकनवरे. कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी पुरस्कारांची घोषणा केली.

त्याच बरोबर सात गटांमधून प्रत्येकी एका अशा सात शेतकऱ्यांचीही निवड पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. ऊस उत्पादन वाढीच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करुन, शिवाय जमिनीची सुपीकता टिकवून अधिक साखर उतारा देणारा ऊस पुरवठा करणाऱ्या सभासद शेतकऱ्यास ‘पांडुरंग आदर्श शेतकरी’ या पुरस्काराने गौरविण्यात येते. या पुरस्काराचे स्वरुप रू. 25,111/- रोख, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र शाल व श्रीफळ असे आहे. या पुरस्काराचे विजते पुढीलप्रमाणे (सभासदाचे नाव, गाव, गट) : नारायण सुभाष रोंगे (खर्डी, पंढरपूर), भीमराव ज्ञानेश्वर बागल (वाखरी, देगांव), नागन्नाथ कुंडलिक जाधव (सिध्देवाडी, चळे), चंद्रशेखर गणपत कोळवले (भंडीशेगांव, भाळवणी), दत्तात्रय बळीराम माळी (भोसे, भोसे), धनाजी जयवंत नरसाळे (जळोली, करकंब)
कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी म्हणाले की, या पुरस्कारांची निवड विविध मानकांच्या आढाव्याद्वारे करण्यात आली आहे. ऊस लागण करते वेळी पूर्व मशागतीपासून माती परीक्षण, चांगल्या बेणेमळ्यातील बेणेचा वापर, हिरवळीची खते, शेणखताचे स्लरीचा वापर, ठिबक सिंचन, जिवाणु खतांचा वापर, विविध द्रवरुप खतांच्या फवारण्या या सर्व बाबींचे मूल्यमापनही पुरस्कारार्थी निवडीवेळी करण्यात आले आहे.
या पुरस्कारांचे वितरण येत्या २६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांचे हस्ते व कारखान्याचे संचालक मंडळ यांचे उपस्थितीमध्ये करण्यात येणार आहे.