महाराष्ट्राचे ऊस संगोपन मॉडेल पंजाबात राबवणार

पंजाबी शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा, एस. एस. इंजिनिअर्सकडून आयोजन

पुणे : महाराष्ट्रातील प्रगत ऊस शेती पाहून भारावलेल्या पंजाबी शेतकऱ्यांनी हे ऊस संगोपन मॉडेल आपल्या राज्यात नेटाने राबवण्याचा संकल्प केला आहे. निमित्त होते साखर उद्योग क्षेत्रातील नामांकित इंजिनिअरिंग कंपनी एस. एस. इंजिनिअर्सचे संस्थापक श्री. शहाजीराव भड यांनी आयोजित केलेल्या आगळ्यावेगळ्या अभ्यास दौऱ्याचे.
साखर उद्योग निर्मितीतील अग्रगण्य एस.एस. इंजिनियर्स यांचे साखर कारखाना निर्मितीमध्ये मोठे योगदान आहे. या कंपनीने महाराष्ट्रा बरोबरच उत्तर प्रदेश, गुजरात आणि पंजाब या ठिकाणी साखर कारखाने उभारून शेतकऱ्यांना आणि तेथील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

पंजाब सरकारने एस. एस. इंजिनियर्स यांच्याकडून पंजाब मधील बटाला आणि गुरुदासपूर जवळ बटाला सहकारी साखर कारखाना आणि गुरुदासपूर सहकारी साखर कारखाना उभारणीचे काम पूर्ण करून घेतले आहे. तेथे गेल्या मागील २ वर्षापासून साखर आणि वीज निर्मिती सुरू झाली आहे.
या भागातील शेतकऱ्यांचे उसाचे उत्पन्न आणि साखर उतारा महाराष्ट्राप्रमाणेच यावा म्हणून एस. एस. इंजिनियर्सचे प्रमुख शहाजीराव भड यांची सतत तळमळ सुरू आहे. यासाठी त्यांनी बटाला आणि गुरुदासपूर त्याचप्रमाणे पंजाब मधील इतर साखर कारखान्याचे प्रत्येकी दोन अशा एकूण २० शेतकऱ्यांचा महाराष्ट्र अभ्यास दौरा नुकताच आयोजित केला होता.

यामध्ये माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना आणि त्या परिसरातील एकरी १०० टनांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी लागवड केलेल्या पाच ठिकाणी भेटी दिल्या. यामध्ये टेंभुर्णी, भोसे, जालाली, करकंब या ठिकाणी ऊस वाण को ८६०३२ आणि कोएम ०२६५ ऊस वाणांच्या प्लॉटची पाहणी केली.
७ ते ८ महिन्यांच्या उसाची वाढ, फुटव्यांची संख्या, पानांचा रंग पाहून शेतकऱ्यांनी पंजाबमध्येही असाच ऊस निर्माण करण्याचा मनोदय व्यक्त केला. १७ फेब्रुवारी रोजी विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. दिगराजे आणि त्यांच्या कारखान्यातील कृषी विभागातील त्यांचे सहकारी श्री. लगड यांनी सर्व पाच ठिकाणी घेतलेल्या प्लॉटची आणि शेतकऱ्यांच्या बरोबर पंजाब मधील या अभ्यासू शेतकऱ्यांशी चर्चा करून एकरी १०० टनापेक्षा अधिक उत्पन्न कसे घेता येईल यावर पंबाजी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी महाराष्ट्रातील अभ्यासू शेतकरी आणि ऊस संजीवनी ग्रुपचे प्रमुख कृषिभूषण संजीव माने, ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ आणि ऊस पैदासकार डॉ. सुरेश पवार, तसेच कारखान्याचे व्हॉइस चेअरमन, चेअरमन आणि संचालक उपस्थित होते. या सर्वांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे निराकरण केले. पंजाबमध्येही चांगल्या प्रतीचा ऊस निर्माण करून त्या ठिकाणचा साखर उतारा आणि ऊस उत्पादकता वाढविण्यासाठी तेथील शेतकऱ्यांना यापुढेही असेच मार्गदर्शन करण्याचा मनोदयदेखील व्यक्त केला.

या चमूने १७ फेब्रुवारीला बारामती येथे मुक्काम करून १८ फेब्रुवारी रोजी बारामती येथील कृषी प्रतिष्ठान आणि कृषी विज्ञान केंद्र येथील ऊसाच्या प्लॉटची पाहणी सकाळच्या सत्रात केली. यावेळी कृषी विज्ञान केंद्रातील विषय तंत्रज्ञ ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि मृदशास्त्रज्ञ डॉ. विवेक भोईटे यांनी सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून या ठिकाणी सर्व प्रयोग आणि उसामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ऊस उत्पादकता आणि साखर उतारा वाढविण्यासाठी घेण्यात आलेल्या ऊस प्रात्यक्षिकांची पाहणी करून माहिती दिली.
त्याचबरोबर सभोवतालच्या माळेगाव सहकारी साखर कारखाना, छत्रपती साखर कारखाना, भवानी नगर आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखाना परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतावरील प्रात्यक्षिके आणि विशेषत: कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ऊस उत्पादन वाढविण्यासाठी घेण्यात आलेल्या प्रात्यक्षिकांची पाहणी केली. यामध्ये सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. भगत यांच्या शेतावरील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऊस उत्पादकता प्रात्यक्षिक पाहून चर्चा केली.
यावेळी पंजाब मधील शेतकरी आणि या परिसरातील शेतकरी आणि ऊस संजीवनीचे अभ्यासू मार्गदर्शक डॉ .संजीव माने आणि मृदशास्त्रज्ञ डॉ. विवेक भोईटे यांनी संपूर्ण दिवस शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या शंकाचे निरसन केले.
या अभ्यास दौऱ्यात पंजाबमधील शेतकऱ्यांनी महाराष्ट्रासारखेच ऊस उत्पादकता आणि साखर उतारा पंजाबमध्ये येण्यासाठी यापुढेही येथील शास्त्रज्ञ आणि शेतकऱ्यांनी पंजाबमध्ये यावे, आम्हाला मार्गदर्शन करावे आणि महाराष्ट्राप्रमाणेच भारताच्या सीमेवरील पंजाबमध्ये साखर कारखानदारी कशी वाढेल आणि लोकांना रोजगार मिळेल यावर अधिक काम करण्याचा मनोदय व्यक्त केला. या अभ्यास दौऱ्याचे संपूर्ण नियोजन आणि आर्थिक नियोजन एस.एस. इंजिनिअर्सचे संस्थापक इंजि. शहाजीराव भड यांनी केले.





