‘पीएफ’ थकवल्याने वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला नोटीस
बीड : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने कर्मचा-यांच्या भविष्य निर्वाह निधीचे (पीएफ) ६१ लाख ४७ हजार रुपये थकवले आहेत. ही रक्कम न भरल्यामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने त्यांच्या कारखान्याला नोटीस बजावली आहे.
मागच्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या कारणाने वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना बंद आहे. त्यामुळे या साखर कारखान्याने कर्मचा-यांच्या पीएफची रक्कम संबंधित कार्यालयाकडे भरली नाही. त्यामुळे ही नोटीस देण्यात आली आहे.
पंकजा मुंडे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन आहेत. तर त्यांच्या भगिनी खा. प्रीतम मुंडे संचालक आहेत.
कारखान्याने कर्मचा-यांच्या पीएफची रक्कम संबंधित कार्यालयाकडे भरली गेली नाही. यामुळे आता पीएफ कार्यालयाने सुद्धा या कारखान्याच्या व्यवस्थापनाला नोटीस बजावली आहे.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा मागील अनेक महिन्यांपासून पाण्याची कमतरता, दुष्काळ यासोबतच वेगवेगळ्या कारणांमुळे बंद आहे. कारखान्याच्या कर्मचा-यांच्या पीएफची रक्कम भविष्य निधी कार्यालयाकडे भरली गेली नाही.
काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा १९ कोटी रुपयांचा साखरेवरील जीएसटी न भरल्या प्रकरणी नोटीस दिली होती. त्यावेळी पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन गावागावांतून पैसे गोळा केले होते. काही कार्यकर्त्यांनी धनादेशही पाठवले आहेत. या प्रकरणास काही महिने होत नाहीत तोपर्यंत पुन्हा ही पंकजा मुंडे यांच्यासमोर अडचण आली आहे.