एफआरपीमध्येही नियोजनबद्ध वाढ गरजेची : हर्षवर्धन पाटील

सिद्धटेक : साखर उद्योगाला स्थिरता येण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा होण्यासाठी केंद्र सरकारने शेतीच्या इतर योजनांबरोबरच उसाच्या एफआरपीमध्येही नियोजनबद्ध वाढ करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. ते अष्टविनायक यात्रेदरम्यान येथे भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी श्री सिद्धिविनायकाचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्षा माधुरी पाटील, हनुमंत भोसले, महेश सांगळे, प्रथमेश शुक्ल आदी उपस्थित होते.
इथेनॉलमुळे देशाच्या परकीय चलनात मोठी बचत
साखर व उसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलमुळे देशाच्या परकीय चलनात मोठी बचत झाली आहे. सध्या देशामध्ये १०५० कोटी लिटर इथेनॉलनिर्मितीसाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली असून, त्यापैकी ६५० कोटी लिटर इथेनॉल साखर उद्योगांमधून तयार करण्याची परवानगी मिळाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत साखर कारखान्यांना हा कोटा यंदा ८ टक्क्यांनी वाढून मिळालेला आहे. केंद्र सरकारच्या सकारात्मक साखर धोरणामुळे हे शक्य झाल्याचे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
…तर उसाला जास्तीत जास्त बाजारभाव मिळू शकेल
साखर व्यवसायात सुसूत्रता येण्यासाठी एफआरपीला एमएसपी (किमान आधारभूत किंमत) तसेच सहवीज निर्मिती व इथेनॉल यांच्या किमतीचे परस्पर लिंकिंग करण्याची आग्रही मागणी आम्ही केंद्र सरकारकडे सातत्याने करीत आहोत. तसे झाल्यास शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीत जास्त बाजारभाव मिळू शकेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.