बाप रे बाप

बाप वाटे कडक उन्हाळा जसा |
लागे शहाळ्याच्या नारळा जैसा||
बाप दिसायला काळासावळा|
त्याचे आहे पोटी अमृत जिव्हाळा||१||
बाप दिसे वरुन फणसा जैसा |
आत गोड गरे ,नका मोजू पैसा||
बाप जणु बोरीवरच्या बोरा जैसा|
वर काटे तरी गोड कसाअसा||२||
बापाच्या कष्टाला नाही सीमा काई |
तेव्हाच हातातोंडाची गाठ होई|
रात्र पहाट संपली कामापायी |
सायकल नाही रोज चाले पायी||३||
लेकीला मु-हाळी पहाटेच जाई|
फाटकी चप्पल दैना झाली लई||
लॅपटॉप घेई,चंची खाली राही |
या बापाचं मोलचं होणार नाही||४||
आईबापचं विठ्ठल रखुमाई |
उकीरड्याची दैना फिटेल बाई||
जीवंतपणीच असू द्या जिव्हाळा|
मेल्यावर कशाला हो कळवळा||५||
आहेर वाळू रघुनाथ, नाशिक