साखर आयुक्तपदी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
![Chandrakant Pulkundwar](https://i0.wp.com/sugartoday.in/wp-content/uploads/2023/06/pulkundwar-copy-ias.jpg?fit=768%2C479&ssl=1)
पुणे : नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची साखर आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे. वरिष्ठ सनदी अधिकारी शेखर गायकवाड सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त झाले होते.
दरम्यान, मी प्रशिक्षणासाठी मसुरी येथे असून, प्रशिक्षण संपताच नव्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहे, असे डॉ. पुलकुंडवार यांनी ‘शुगरटुडे’शी बोलताना सांगितले.
मूळचे नांदेडचे असलेले डॉ. पुलकुंडवार हे जुलै २०२२ मध्ये नाशिक महापालिकेचे आयुक्त म्हणून रूजू झाले होते. त्यानंतर आयुक्त व प्रशासक असा दुहेरी भूमिकेतून त्यांनी शहराच्या विकासाची गती वाढवण्याचा प्रयत्न केला. महानगरपालिकेच्या महसुलात वाढ करण्यासाठी विविध उपाययोजना त्यांनी राबविल्या.
डॉ. पुलकुंडवार यांनी यापूर्वी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या सांभाळल्या आहेत. रस्ते विकास महामंडळाचे सरव्यवस्थापक संचालक म्हणून ते काम बघत होते. समृध्दी महामार्गांसाठीची भूसंपादन प्रक्रिया त्यांनी मोठ्या कौशल्याने हाताळली. ते २००८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
त्यांनी यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी, पुनर्विकास अधिकारी म्हणून, मेळघाट येथे उपविभागीय अधिकारी, कृष्णा खोरे प्रकल्पात विशेष भूसंपादन अधिकारी, नांदेडमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी, परभणीत उपविभागीय अधिकारी, अंधेरीत एमआयडीसीचे उपमहाव्यवस्थापक म्हणून काम बघितले. २००८ मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचे खासगी सचिव म्हणून, त्यानंतर तत्कालीन आरोग्य मंत्र्यांचे खासगी सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. प्रशासनाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे.