ऊस वजन काट्यातील हेराफेरीला लगाम!

४ साखर कारखान्यांची प्रशासनाकडून अचानक तपासणी
बीड : साखर कारखान्यांवर उसाच्या वजनात तफावत आढळत असल्याच्या तक्रारींनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. बीड जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची वैधमापन शास्त्रविभागातर्फे (Weights & Measures Department) कसून तपासणी सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत चार मोठ्या कारखान्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे.
तहसीलदार, पोलीस निरीक्षक, वैधमापन शास्त्र निरीक्षक आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्रितपणे ही तपासणी केली. कारखान्यांमध्ये वापरले जाणारे काटे सुस्थितीत आहेत का आणि त्यांचे ‘मुद्रांकन’ (Stamping) नियमानुसार झाले आहे का, याची खातरजमा करण्यात आली.
९ कारखान्यांवर लक्ष
जिल्ह्यातील ९ खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांचा २०२५-२६ चा गाळप हंगाम सुरू असून, सर्वच ठिकाणी टप्प्याटप्प्याने तपासणी केली जाणार आहे.
शेतकऱ्यांसाठी तक्रार निवारण कक्ष
वजनात तफावत आढळल्यास शेतकऱ्यांनी गप्प न बसता तक्रार करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. यासाठी मराठवाड्यातील ७ कार्यालयांचे दूरध्वनी क्रमांक आणि प्रमुख अधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
तपासणी पथकात कोणाचा समावेश?
या मोहिमेत तहसीलदार राकेश गिड्डे, संतोष रुईकर, वैधमापन निरीक्षक गणेश मिसाळ, विठ्ठल चिट्टलवाड, पोलीस निरीक्षक बालक कोळी आणि शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी भाई मोहन गुंड, भाई नारायण गोले आदींचा समावेश होता.






