योगेश्वरी शुगरचे चेअरमन आर. टी. देशमुख यांचा अपघाती मृत्यू

आवडल्यास ही बातमी शेअर करा

लातूर: योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि माजलगावचे माजी आमदार आर. टी. देशमुख (जिजा) यांच्या मोटारीला औसा रोडवर बेलकुंड गावाजवळ भीषण अपघातात झाला, लातूरच्या रुग्णालयात नेत असताना, त्यांचा मृत्यू झाला, तर चालक गंभीर जखमी झाला आहे.
हा अपघात २६ मे रोजी दुपारी ४. १९ वाजेच्या दरम्यान झाल्याची माहिती आहे. देशमुख हे माजलगाव मतदारसंघात २०१४ ते २०१९ साली आमदार होते.

देशमुख हे आपल्या कारने ( क्र. एमएच ४४ एडी २७९७) तुळजापूरमार्गे लातूरकडे येत होते. दुपारी ४:१९ वाजता बेलकुंडनजीक असलेल्या उड्डाणपुलावरून काही अंतरावर कार पुढे आल्यावर रस्त्यावर साचलेले पाणी कारच्या काचेवर पडले. त्यामुळे चालकाचा भरधाव कारवरील ताबा सुटला.
बाजूस असलेल्या रस्त्याच्या कठड्याला कार जोरात धडकली. अपघातात कार चारवेळा पलटी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. यात कारचालक व आर. टी. देशमुख गंभीर जखमी झाले. दोघांनाही रुग्णवाहिकेतून लातूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, रस्त्यातच देशमुख यांचा मृत्यू झाला. चालकावर उपचार सुरू आहेत.

जिजा म्हणून परिचित
जिजा म्हणून सर्वत्र परिचित असलेले आर. टी. देशमुख हे माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. २०१४ मध्ये माजलगावामध्ये राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके यांचा देशमुख यांनी सुमारे ३७ हजार मताधिक्क्याने पराभव केला होता. त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठे योगदान दिले होते. त्यांच्या निधनाने एक अनुभवी व प्रगल्भ नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीजच्या माध्यमातून ते काही वर्षांपासून साखर उद्योगात योगदान देत होते. या अचानक घडलेल्या घटनेमुळे देशमुख कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ते ओळखले जात. देशमुख यांच्या निधनाचे वृत्त समजताच पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करून, लातूरकडे प्रयाण केले. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »