‘भीमा पाटस’ची चौकशी थोरातांच्या काळापासून करा : राहुल कुल

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : “भीमा पाटस साखर कारखान्याची चौकशी करण्याला माझा विरोध नाही. मात्र ती रमेश थोरात यांच्याकडे कारखाना असल्यापासून करावी. त्यास माझा पाठिंबा आहे, ” असा प्रतिटोला भीमा पाटस साखर कारखान्याचे अध्यक्ष, आमदार राहुल कुल यांनी लगावला.

कुल यांच्या विरोधकांनी वरवंड येथे जाहीर सभा घेत कारखान्यातील भ्रष्टाचारावर जोरदार टीका केली होती. या सभेसाठी खासदार संजय राऊत यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनीही कुल यांच्यावर गंभीर आरोप केले. त्याला उत्तर देण्यासाठी कुल यांनी पाटस येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी नंदकुमार पवार, दादासाहेब केसकर, तुकाराम ताकवणे, विकास शेलार आदी उपस्थित होते.

कुल म्हणाले, “मी हक्कभंग समितीचा अध्यक्ष झाल्यामुळे आरोपांचा पुनरुच्चार होत आहे. त्यात नवीन काही नाही. मात्र भीमा पाटस कारखान्याचे विस्तारीकरणाचा खर्च ३६ कोटींवरून ७८ कोटीवर कसा गेला, भीमा सेवा संघावर विनातारण विनाकारण ५९ कोटी रुपये कर्ज कोणी आणि कसे उचलले, याचीही चौकशी झाली पाहिजे.

मुळात प्रचंड कर्जबाजारी असलेल्या कारखान्याचा सन २००२ मध्ये अध्यक्ष झालो. सन २००२ च्या कारखाना निवडणुकीत सभासदांनी थोरात यांना सणसणीत चपराक दिली. तेव्हापासून ते आतापर्यंत थोरात यांनी कारखाना निवडणूक लढविण्याचे धाडस केलेले नाही, असे कुल म्हणाले.

संजय राऊत म्हणतात, ‘कुल यांनी बाजूला व्हावे, रमेश थोरात कारखाना चालवतील.’ पण, त्यासाठी निवडणूक तर लढविली पाहिजे ना. जनतेच्या न्यायालयात जाऊन कौल घ्यावा. दूध का दूध व पाणी का पाणी होऊन जाऊदे एकदा. चांगल्या चाललेल्या कारखान्यात विरोधकांनी राजकारण आणू नये. कारखाना सहकारीच आहे. तो फक्त भाडेतत्त्वावर चालवायला दिला आहे. कारखाना चालवायला देताना खुले टेंडर होते. क्षमता असणाऱ्या निराणी ग्रुपने ते भरले, त्यांना ते मिळाले, असा खुलासाही कुल यांनी केला.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »