साखर क्षेत्रात ३० हजार कोटींची गुंतवणूक : आयुक्त

कार्यकारी संचालकांचा अभ्यास गट तयार करा
कोपरगाव : गेल्या तीन वर्षांत साखर क्षेत्रामध्ये सुमारे ३० हजार कोटींची गुंतवणूक होऊन, हजारो रोजगार तयार झाले आहेत. त्याचा युवकांना लाभ होत आहे, असे प्रतिपादन राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले.
गायकवाड यांना ‘सर ही मानद उपाधी मिळाल्याबद्दल त्यांचा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी विशेष सन्मानपत्र देऊन सपत्निक सत्कार केला. यानिमित्ताने अहमदनगर, नाशिक व संभाजीनगर जिल्हयातील कार्यकारी संचालकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात मार्गदर्शन करतांना गायकवाड बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे होत्या. राज्य विक्रीकर विभागाच्या लवादाचे प्रमुख सुमेरकुमार काले, सहसंचालक शरद जरे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
गायकवाड म्हणाले, साखर आयुक्त म्हणून काम करताना शंभर निर्णय घेऊन त्याची गतिमान अंमलबजावणी केली. त्यामुळे गेल्या तीन वर्षांमध्ये इथेनॉल, आसवनी, सहवीजनिर्मिती आणि संबंधित उद्योगांमध्ये ३० हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. बंद पडलेले ३० कारखाने सुरू होऊ शकले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाला. आधुनिकीकरणामुळे दैनदिन गाळप क्षमतेत वाढ झाली आहे. साखर उद्योगातील बदलांच्या अभ्यासासाठी कार्यकारी संचालकांनी अभ्यासगट तयार करून सन २०५० मधील साखर कारखानदारी कशी असेल यासाठी आतापासूनच काम सुरू करावे.
सहकाररत्न माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी देशातील साखर उद्योगाला स्पर्धेत टिकण्यासाठी सातत्यांने तंत्रज्ञान विकास बदलाचा विचार दिला, त्यांचे नातू विवेक कोल्हे यांनी कारखानदारीच्या माध्यमांतून फार्मा क्षेत्रातही प्रवेश केला आहे. त्यांच्याबरोबरच संचालक मंडळाच्या दुरदर्शी वाटचालीमुळे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याची फार्मा क्षेत्रात आगामी काळात भारतात नवी ओळख निर्माण होईल, असा विश्वासही गायकवाड यांनी व्यक्त केला.
सहकारासमोर खासगीचे आव्हान आहे; पण साखर कारखानदारी व त्यात कार्य करणा-या युवा नेतृत्वाने यातील बदलांचा वेळीच अभ्यास करून तशी ध्येयधोरण घेवुन आपण आपली स्वतःची ओळख वेगवेगळी उत्पादने घेवुन निर्माण केली तरच साखर उद्योग टिकेल, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांचा वाढदिवसानिमित्त गायकवाड यांनी सत्कार केला.
कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी प्रास्तविकात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्या प्रगतीचा आढावा घेतला.
श्री. बिपीनदादा कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी खाजगी कारखानदारीशी संघर्ष करत सहकाराला पाठबळ दिले. आधुनिक तंत्रज्ञानाचा कार्यक्षम वापर करून उपपदार्थ निर्मातीबरोबरच सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याची देशात वेगळी ओळख निर्माण केली
सौ. कोल्हे म्हणाल्या की, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना माणसांच्या मनाची जोड मिळाल्याने त्यांचे प्रशासकीय कामकाज सर्वांनाच प्रेरणादायी ठरणार असून त्यांची २३ पुस्तके वैशिष्टय व अभ्यासपुर्ण आहेत.
याप्रसंगी उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक विश्वासराव महाले, ज्ञानेश्वर परजणे, बापूसाहेब बारहाते, निलेश देवकर, बाळासाहेब वक्ते, ज्ञानदेव औताडे, रमेश आभाळे, राजेंद्र कोळपे, विलासराव वाबळे, मनेष गाडे, विलासराव माळी, त्रंबकराव सरोदे, सौ. उषाताई संजय औताडे, सौ. सोनियाताई बाळासाहेब पानगव्हाणे, निवृत्ती बनकर, सतिष आव्हाड, आदिंच्या हस्ते अहमदनगर, नाशिक व संभाजीनगर जिल्हयातील सर्व कार्यकारी संचालकांचा सत्कार करण्यांत आला.
आभार उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यांसाठी साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, मनुष्यबळ विकास अधिकारी प्रदीप गुरव, सचिव ॲड. तुळशीराम कानवडे व त्यांच्या सर्व सहका-यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन प्रा. साहेबराव दवंगे यांनी केले. कामगार नेते मनोहर शिंदे, माजी सभापती सुनील देवकर, अशोक साखर कारखान्याचे संचालक श्री. शिंदे, सभासद शेतकरी, सर्व खाते प्रमुख, उपखातेप्रमुख, विभागप्रमुख, संजीवनी उद्योग समुहातील विविध संस्थांचे आजी माजी संचालक याप्रसंगी मोठया संख्येने उपस्थित होते.