थकीत एफआरपीमुळे भीमाशंकर शुगरला आर.आर.सी.चा दणका

धाराशिव: उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत (FRP) वेळेत न दिल्यामुळे साखर आयुक्तालयाने वाशी तालुक्यातील पारगाव येथील भीमाशंकर शुगर मिल्स लिमिटेड या कारखान्याविरुद्ध कडक कारवाई केली आहे.
कारखान्याकडे शेतकऱ्यांचे सुमारे १२ कोटी २६ लाख ५१ हजार रुपये थकल्याने कारखान्याला ‘महसूल वसुली प्रमाणपत्र‘ (RRC) नोटीस बजावण्यात आली आहे . ऊस नियंत्रण कायद्यानुसार, ऊस पुरवठा केल्याच्या १४ दिवसांच्या आत बिले देणे बंधनकारक असते, जे या कारखान्याने पाळले नाही.
या नोटीसनंतर आता जिल्हाधिकाऱ्यांना कारखान्याची साखर, मालमत्ता किंवा जमीन जप्त करून तिचा लिलाव करण्याचे आणि शेतकऱ्यांचे पैसे वसूल करण्याचे कायदेशीर अधिकार प्राप्त झाले आहेत. दरम्यान, कारखान्याचे कार्यकारी संचालक नितीन लोढा यांनी दावा केला आहे की, एफआरपीचे वाटप नियमितपणे सुरू असून त्याची माहिती आयुक्तालयाला कळवली जाईल.






