साखर उद्योगातील ‘दादा’

आवडल्यास ही बातमी शेअर करा

अजित पवार हे महाराष्ट्रातील खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांच्या राजकारणात एक प्रमुख नाव.., महाराष्ट्रात त्यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा साखर उद्योगावर मोठा प्रभाव होता आणि राहील… त्यांनी १९८४ नंतर प्रथमच गतवर्षी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या (बारामती) संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयी होत पुन्हा एकदा कारखान्यावर निर्विवाद सत्ता मिळवली. या निवडणुकीत पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने २१ पैकी २० जागांवर विजय मिळवला – यावरून त्यांच्या नेटवर्कची ताकद स्पष्ट होते.

हे सगळं आज आठवण्याचं कारण म्हणजे… गेल्या जानेवारी महिन्यात अत्यंत दुर्दैवी विमान अपघातात दादांचे निधन झाले आणि संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली. राज्याचे अपरिमित नुकसान झाले. त्याचबरोबर साखर उद्योगाचा मोठा आधारही आपण गमावला. त्यांची २२ जुलै २०२६ रोजी पहिली जयंती. यानिमित्ताने त्यांच्याबद्दल विविध लेख प्रसिद्ध होतील, त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जाईल. मात्र साखर उद्योगाशी असलेला त्यांचा वेगळा स्नेह आणि छाप याकडेही सर्वांचे विशेषत्वाने लक्ष जावे, या उद्देशाने ‘शुगरटुडे’ ही शब्दरूपी आदरांजली वाहत आहे. – संपादक

अजितदादांचे साखर उद्योग क्षेत्रात मोठे योगदान आहे.

बारामती, पुणे आणि आजुबाजूच्या जिल्ह्यांतील अनेक सहकारी आणि खासगी साखर कारखाने थेट किंवा अप्रत्यक्षपणे अजित पवार किंवा त्यांच्या समर्थकांच्या नियंत्रणाखाली आहेत. माळेगाव सहकारी साखर कारखाना, जरंडेश्वर साखर कारखाना, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, छत्रपती सहकारी साखर कारखाना, दौंड शुगर, अंबालिका शुगर अशा अनेक कारखाने त्यांच्या अधिपत्याखाली होते आणि भविष्यातही ते दादांच्या विचारांना समोर ठेवूनच चालतील. याशिवाय दादांशी संबंधित निकटवर्तीयांचे दोन डझन कारखाने आहेत.

कृषीक्षेत्रातील योगदान

अजितदादांनी कृषी क्षेत्रातही अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले:

कृषी वाढ दर (२०२३-२४): ३.३% वरून थेट ८.७% पर्यंत वाढ. हे आर्थिक मदतीमुळे आणि शेतकऱ्यांना स्थिर आर्थिक पाठबळ दिल्यामुळे शक्य झाले आहे.

एआय (Artificial Intelligence) वापर, जलयुक्त शिवार, ‘वन तालुका वन मार्केट’, नदीजोड प्रकल्प, बाम्बू लागवड, सिंचन प्रकल्प, आणि ग्रिड-प्रणालीद्वारे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पाणीपुरवठा यासारखे उपक्रम सुरू केले.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील साखर कारखान्यांनी व सहकार चळवळीने महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठे योगदान दिले आहे. त्यांनी कृषीमध्ये शाश्वत वाढ, नव्या तंत्रज्ञानाचा वापर, आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास साधण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या.

अजित पवार यांच्या मातोश्री देवळाली प्रवरा येथील कदम घराण्यातील…. तर ज्येष्ठ नेते शरद पवारांचे मोठे भाऊ असलेले, अजित पवार यांचे वडील अनंतराव पवार हे व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टूडिओमध्ये नोकरीला होते. अजित पवार यांचे आजोबा गोविंदराव पवार हे बारामती सहकारी खरेदी विक्री संघामध्ये नोकरीला होते तर आजी शारदाबाई या काटेवाडीतील शेती सांभाळात असत.

ज्येष्ठ नेते खा. शरद पवार भाषणातून नेहमी त्यांच्या आईचा म्हणजेच शारदाबाईंचा उल्लेख अत्यंत अभिमानाने आणि आदराने करतात. तर याच माऊलीचे संस्कार अजित दादांनाही मिळाले. सर्व सामान्य कुटुंबात वाढलेल्या अजित दादांचे आयुष्य सुरूवातीला अत्यंत सामान्य आणि हाल अपेष्टांमधून गेले. त्यामुळे मानवी जीवनातील दुःख, दारिद्य, अडचणी यांची पुरेपुर जाण त्यांना होती.

अजित पवारांचे शालेय शिक्षण देवळाली प्रवरा येथे झाले. त्यानंतर काका शरद पवार यांच्याकडे दहावीनंतरच्या शिक्षणासाठी मुंबईत आले. तोपर्यंत शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीने चांगलाच वेग घेतला होता. महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण करून दादांनी पुन्हा बारामती गाठली या कर्मभूतीतील सहकारी सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरवात केली. थोड्याच वेळात अजित पवारांनी या क्षेत्रात चांगली पकड घेतली. यानंतर १९९१ ला त्यांची पुणे मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपदी नियुक्ती झाली आणि त्याचवर्षी ते विधानसभा निवडणूकीत भरघोस मतांनी निवडूनही आले.

या विजयानंतर त्यांना कृषी, फलोत्पादन आणि उर्जा राज्यमंत्री झाले. त्या बरोबरच त्यांनी एकदा बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस १९९९ मध्ये सत्तेत आल्यानंतर अल्पावधीत सरकार आणि संघटना या दोन्ही ठिकाणी अजितदादांनी आपला प्रभाव वाढवला. अजितदादांनी २०१४ पर्यंत राज्यात विविध खाती सांभाळली. प्रशासनावर वचक असलेला नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.

पक्ष कार्यकर्त्यांना त्यांची कारभाराची कार्यक्षम शैली आकर्षित करते. पाच वेळा बारामतीचे आमदार म्हणून विक्रमी मतांनी विजयी होणाऱ्या अजित पवार यांनी बारामतीचा चेहरामोहरा बदलला. राज्यातून २०१४ नंतर पक्षाची सत्ता गेल्यानंतर अजितदादा स्वस्थ बसलेले नव्हते. ‘राजकीय जीवनात चढउतार होत असतात. सत्तेचा कोणीही ताम्रपट घेऊन आलेला नसतो. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वस्थ बसायचे नाही,’ असा त्यांचा कार्यकर्त्यांना सांगावा असे. सरकार असो अथवा नसो अजित पवारांनी त्यांच्या नावाचा दबदबा राजकीय वर्तुळात कायम ठेवला होता.

शरद पवारांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांच्यात आणि सुप्रिया सुळेंमध्ये स्पर्धा असली तरी अजित पवार यांनी ते कधीच दाखवले नाहीत. या संबंधींच्या प्रश्नांना ते अत्यंत संयमाने उत्तरे देत असत. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना अजित पवारांनी आपल्या कामाची वेगळी छाप सोडली होती.

दारूबंदीच्या निर्णयाला पाठिंबा, आधुनिक शिक्षणासाठी शाळा-महाविद्यालयांना प्रोत्साहन, नगर-विकास, पंचायत राज व्यवस्थेत सर्व घटकांना सामावून घेणं, शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रश्नाची मांडणी करणं या सगळ्यांत अजित पवारांचं योगदान महत्वपूर्ण राहिलं आहे.

राज्यात कोरोनाचं संकट असताना अजित पवारांनी पायाला भिंगरी लावून परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न केले. राज्याच्या मुख्यमंत्री पदाने अजित पवारांना कायम हुलकावणीच दिली. तगडी खाती पदरात पाडून घेताना राष्ट्रवादी पक्षाने १५ वर्षं उपमुख्यमंत्रीपदच आपल्या वाट्याला घेतलं. सध्याच्या सत्ता-संघर्षात राष्ट्रवादीने स्वतःची बार्गेनिंग पॉवर वाढवलीय एवढं मात्र नक्की.

महाआघाडी सोबत असतानाही आणि नंतर महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व अर्थमंत्रीपद सांभाळतानाही दादांनी साखर उद्योगाच्या प्रश्नांवर तेवढ्याच गांभीर्याने लक्ष दिले. मुळात त्यांचे नेतृत्व सहकारातून घडत गेल्याने तो त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. साखर उद्योग ग्रामीण भागाच्या अर्थकारणाचा कणा आहे याची त्यांना जाणीव होती, त्यामुळेच ते सातत्याने या संदर्भातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत असत.

साखरेची एमएसपी वाढ आणि इथेनॉल प्रश्न यासाठी त्यांनी तीन-चार केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमितभाई शाह यांची भेट घेतली. एमएसपीच्या प्रश्नावर ते केंद्राकडे नियमितपणे पाठपुरावा करत. याबाबत येत्या काही दिवसांत निर्णय होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. पण तो निर्णय ऐकण्यासाठी दादा आज आपल्यामध्ये नाहीत.

ऊस उत्पादक शेतकरी, सहकारी साखर कारखाने, कामगार, वाहतूक, यांत्रिकी सेवा, ऊर्जा निर्मिती आणि ग्रामीण रोजगाराची साखळी या उद्योगाभोवती उभी आहे. देशातील एकूण साखर उत्पादनापैकी सुमारे 35 ते 40 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते. त्यामुळे या उद्योगातील कोणताही धोरणात्मक बदल थेट लाखो कुटुंबांच्या उपजीविकेवर परिणाम करतो. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि अनुभवी प्रशासक अजित पवार यांचे साखर उद्योगातील योगदान हे केवळ राजकीय नव्हे, तर संरचनात्मक स्वरूपाचे ठरते.

उद्धव ठाकरे सरकार मध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम करत होते. नंतर त्यांनी श्री. एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये जुलै २०२३ मध्ये सामील होऊन अर्थमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली. ५ डिसेंबर २०२५ रोजी पुन्हा उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचा शपथविधी झाला. ते अर्थमंत्रीही झाले. पुढे मोठी इनिंग खेळायची होती. त्यासाठी त्यांनी तगडे नियोजन केले हेाते. मात्र २८ जानेवारी २०२६ रोजी एका भयंकर अपघाताने त्यांना आपल्यापासून हिरावून नेले ते कायमचेच. महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण आणि विकास यावरील त्यांचा ठसा मात्र कायम राहील. तो कोणीही हिरावू शकणार नाही.

महाराष्ट्राच्या या दादांना ‘शुगरटुडे’ची भावपूर्ण आदरांजली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »