गाळपपूर्व कारखान्यांचे वजनकाटे तपासणार!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

काटामारी रोखण्यासाठी पथके सज्ज

पुणे : राज्यात २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांवरील वजनकाट्यांच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. ऊस वजनात काटामारी होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत कारखान्यांवरील वजनकाट्यांची अचानक तपासणी करण्यासाठी जिल्हानिहाय आणि तालुकानिहाय भरारी पथके स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांच्या ऊस वजनात फसवणूक होऊ नये, यासाठी ही पथके कोणतीही पूर्वसूचना न देता साखर कारखान्यांना भेट देतील. वजनकाट्यांच्या कॅलिब्रेशनमध्ये फेरफार करून वजन कमी दाखविल्याचे आढळल्यास संबंधित कारखाना अथवा जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

अनेक विभागांच्या अधिकाऱ्यांचा पथकात समावेश

या भरारी पथकांमध्ये महसूल विभाग, पोलिस, वैधमापनशास्त्र विभाग, माहिती-तंत्रज्ञान तज्ज्ञ, प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाचे अधिकारी तसेच शेतकरी प्रतिनिधींचा समावेश करण्यात येणार आहे. कारखान्यांची संख्या लक्षात घेऊन तालुकास्तरावर किंवा जिल्हास्तरावर पथके कार्यरत राहतील. वजनकाट्याबाबत प्रशासन किंवा पोलिसांकडे तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित काट्याची तातडीने तपासणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. गैरप्रकार सिद्ध झाल्यास संबंधित विभागाकडून नियमानुसार कारवाई केली जाईल.

कॅलिब्रेशननंतर वजनकाटा सील करणे बंधनकारक

ऊस वजनकाट्याच्या कॅलिब्रेशनमध्ये फेरफार करून शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी कॅलिब्रेशन पूर्ण झाल्यानंतर वजनकाटा सील करणे बंधनकारक करण्यात आले आहे. वैधमापन अधिकाऱ्यांनी तपासणीच्या वेळी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन त्यांच्या उपस्थितीत वजनकाटा सील करावा, असे निर्देश आहेत.

शेतकऱ्यांच्या हक्काच्या वजनावर प्रशासनाची नजर

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाचे योग्य वजन मिळणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वीच वजनकाट्यांची काटेकोर तपासणी झाल्यास वजनातील गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ‘काटामारी’ करणाऱ्या कारखान्यांवर आता प्रशासनाची करडी नजर राहणार आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »