हे नवे पेट्रोल ( E85) खूप स्वस्त; पण ते तुमच्या गाडीत भरण्यापूर्वी हे तपासा

पेट्रोलपेक्षा २८ रुपयांनी स्वस्त ‘E85’ इंधन बाजारात; पण तुमच्या गाडीत हे चालेल का? जाणून घ्या गणित
नवी दिल्ली: भारताच्या इथेनॉल-मिश्रण कार्यक्रमात एक मोठे पाऊल पडले आहे. दिल्लीमध्ये आता ‘E85’ नावाचे नवीन इंधन लाँच करण्यात आले असून त्याची किंमत ८२.१२ रुपये प्रति लिटर इतकी ठेवण्यात आली आहे.
मुंबईत पेट्रोलचे दर सध्या सुमारे ११० रुपये प्रति लिटर असताना, हे नवीन इंधन जवळपास २८ रुपयांनी स्वस्त आहे. मात्र, हे इंधन वापरण्यापूर्वी वाहनधारकांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे.
१. नक्की काय आहे E85 इंधन? साध्या पेट्रोलमध्ये सध्या २० टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिसळले जाते (E20), मात्र E85 मध्ये ८५ टक्के इथेनॉल आणि केवळ १५ टक्के पेट्रोल असते. यामध्ये इथेनॉलचे प्रमाण जास्त असल्यामुळे या इंधनासाठी खास डिझाइन केलेले इंजिन आणि फ्युएल सिस्टम आवश्यक असते.
२. तुमच्या गाडीत हे इंधन चालेल का?
सध्या भारतातील बहुतांश पेट्रोल गाड्यांमध्ये E85 इंधन वापरता येणार नाही. तुमची गाडी जरी E20 ला सपोर्ट करत असली, तरी ती E85 साठी योग्य असेलच असे नाही. जर तुम्ही साध्या पेट्रोल गाडीत हे इंधन टाकले, तर इंजिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो आणि लांब पल्ल्यात इंजिनचे मोठे तांत्रिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे तुम्ही इ-२० हेच इंधन वापरा.
३. ‘फ्लेक्स-फ्युएल‘ गाड्यांची आवश्यकता
E85 इंधन वापरण्यासाठी तुमची गाडी ‘फ्लेक्स-फ्युएल‘ (Flex-Fuel) सुसंगत असणे गरजेचे आहे. अशा गाड्या पेट्रोलपासून ते E85 पर्यंतच्या कोणत्याही मिश्रणावर आपोआप इंजिनचे पॅरामीटर्स सेट करून चालू शकतात. मारुती सुझुकीने नुकतीच त्यांची ‘वॅगन-आर फ्लेक्स फ्युएल‘ ही कार अशाच प्रकारच्या इंधनासाठी विकसित केली आहे.
E85 इंधन पेट्रोलपेक्षा सुमारे २० टक्क्यांनी स्वस्त असले तरी, एक तांत्रिक अडचण आहे. इथेनॉलमध्ये पेट्रोलच्या तुलनेत ऊर्जा कमी असते, त्यामुळे गाडीच्या मायलेजमध्ये थोडी घट होऊ शकते.
सरकारचा उद्देश काय?
- कच्च्या तेलाची आयात कमी करून परकीय चलन वाचवणे.
- देशांतर्गत इथेनॉल उत्पादनाला (शेतकऱ्यांना) प्रोत्साहन देणे.
- वाहनांमधून होणारे प्रदूषण कमी करणे.
सध्या E85 इंधन हे केवळ दिल्लीसारख्या निवडक ठिकाणी उपलब्ध आहे आणि फ्लेक्स-फ्युएल गाड्यांची संख्याही कमी आहे . जोपर्यंत अशा गाड्या मोठ्या प्रमाणावर बाजारात येत नाहीत, तोपर्यंत E85 हे केवळ एक तांत्रिक प्रात्यक्षिक म्हणूनच राहील. त्यामुळे गाडीत इंधन भरण्यापूर्वी ती E85 साठी सक्षम आहे की नाही, याची खात्री नक्की करा.






