दिलीप पाटील यांची IFGE च्या पश्चिम विभागीय संचालकपदी नियुक्ती

नवी दिल्ली/पुणे: ‘इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी’ (IFGE) या संस्थेने दिलीप पाटील यांची विभागीय संचालक – (पश्चिम ) म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे. हरित ऊर्जा आणि जैवइंधन (Bioenergy) क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
श्री. पाटील यांच्याकडे जैवइंधन क्षेत्राचे सखोल ज्ञान असून त्यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम भारतातील IFGE च्या उपक्रमांना आणि कार्याला मोठी चालना मिळणार आहे. या विभागातील हरित ऊर्जा परिसंस्थेमध्ये नवनवीन प्रयोग, उद्योगांमधील सहकार्य आणि शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी ते काम करणार आहेत, असे संस्थेने म्हटले आहे.
विभागीय संचालक पदासोबतच, श्री. पाटील हे IFGE चे प्रमुख प्रकाशन असलेल्या ‘भारत बायोएनर्जी कंपास‘ (Bharat Bioenergy Compass) च्या संपादकीय सल्लागार मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. या माध्यमातून त्यांनी माहितीची देवाणघेवाण आणि उद्योगातील विविध घटकांना एकत्र आणण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे.
IFGE ने श्री. पाटील यांचे त्यांच्या या नवीन निवडीबद्दल अभिनंदन केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम भारतामध्ये संस्थेची उपस्थिती अधिक प्रभावी होईल आणि हरित ऊर्जा क्षेत्रातील प्रभाव वाढेल, असा विश्वास व्यक्त करत संस्थेने त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या नव्या महत्त्वपूर्ण जबाबदारीबद्दल श्री. पाटील यांनी आयएफजीईचे आभार व्यक्त केले आणि या जबाबदारीला पूर्ण न्याय देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.






