सतेज पाटील गटाच्या २९ उमेदवारांचे अर्ज बाद
राजाराम कारखाना निवडणूक
कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक छाननीत २३७ अर्जांपैकी ४१ उमेदवारांचे अर्ज अपात्र, तर १५० अर्ज पात्र ठरले. कारखान्याशी ऊस पुरवठ्याबाबत केलेल्या कराराचा भंग केल्याचा ठपका ठेवत २९ जणांचे अर्ज अपात्र ठरवले. हे सर्व माजी मंत्री सतेज पाटील गटाचे आहेत.
या निर्णयानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर विरोधी आघाडीच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी देत निवडणूक यंत्रणेचा निषेध केला.
‘राजाराम’ कारखान्याच्या २१ जागांसाठी विविध गटातून २३७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मंगळवारी या अर्जांची छाननी झाल्यानंतर यामधील ४१ अर्ज अपात्र ठरवण्यात आले. कारखान्याला ऊस पुरवठा करण्याबाबत शेतकरी करार करतात, त्या करारानुसार ऊस पुरवठा केला नाही, तर कारखान्याच्या निवडणुकीत उभे राहता येणार नाही, असा पोटनियम आहे. त्याचा आधार घेऊन हे अर्ज अपात्र ठरवले आहेत.
विरोधी आघाडीचे उमेदवार अपात्र ठरल्याचे समजात संतप्त सभासदांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. ‘ दबावाखाली येऊन निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो ’, ‘ दम असेल तर मैदानात उतरा ’ अशा घोषणा देण्यात आल्या.
कारखान्याकडे ऊस क्षेत्राची नोंद दिली, पण महापूरासह इतर नैसर्गिक कारणाने उसाचे उत्पादन घटले मग करारानुसार ऊस पाठवायचा कसा ? असा सवाल यावेळी सभासदांनी केला.
गडमुडशिंगी गावात तब्बल ४४३ मतदान आहे. येथून विरोधी आघाडीकडून डॉ. अशोक पाटील यांची उमेदवारी निश्चित होती. त्यांच्यासह त्यांच्या पत्नी व इतर दोघांचे असे चारही अर्ज अपात्र ठरले आहेत.
अपात्र ठरलेले उमेदवार असे :
- गट क्र.१ – बाबूराव बेनाडे, पांडुरंग जाधव
- गट क्र.२- सर्जेराव माने, दिगंबर पोळ, उत्तम सावंत, मधुकर खोत, अजितकुमार पाटील, अमित भंडारी, संदीप भंडारी, बाळासाहेब माने, नागनाथ भोसले, लालासो कोळी.
- गट क्र.३- बाजीराव पाटील, बाळासाहेब पाटील, नामदेव शिंदे, सुरेश पाटील.
- गट क्रमांक ४- महादेव पाटील, गणपती यादव, राजकुमार पाटील , अशोक पाटील, रंजना पाटील, सखाराम गौड, शिवाजी पाटील.
- गट क्रमांक ५- जयसिंग पोवार
- गट क्रमांक ६- रामचंद्र नलवडे, प्रकाश खराडे, रघुनाथ चव्हाण, सुधाकर साळोखे, बाबूराव चौगले, चंद्रकांत चौगले, शिवाजी पाटील, मारुतराव मेडशिंगे, मारुती मगदूम, दत्तात्रय पाटील, अजित पाटील, बाजीराव चौगले, गणपती पाटील, दीपसिंह नवले, बबन पाटील.
- महिला राखीव – रंजना पाटील
- इतर मागास प्रवर्ग – नामदेव पाटील.