राजेंद दादा पवार (वाढदिवस)

शरयू ॲग्रो इंडस्ट्रीजचे चेअरमन, बारामती ॲग्रो लि. चे चेअरमन, साखर उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणारे व्यक्तिमत्त्व कृषिरत्न राजेंद्र पवार ऊर्फ दादा यांचा १७ जून रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना शुगरटुडे परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा!
कृषी क्षेत्र आणि कृषी शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे दादांना कृषिरत्न हा कृषी क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे. शेती आणि सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांना या कामासाठी आणखी ऊर्जा आणि दीर्घायुरोग्य मिळो, अशा शुभेच्छा!
चार वर्षांपूर्वी त्यांची एकषष्ठी साजरी झाली. त्यावेळी त्यांनी फेसबूकवर टाकलेले मनोगत अनेकांना भावले होते. ते या ठिकाणी पुन्हा देत आहोत.

१७ जून, माझा वाढदिवस.एकसष्ठीचा प्रवास करत असताना घरच्या सर्व माणसांसोबत साधेपणाने एकत्रित साजरा केला.माझा धाकटा भाऊ रणजित व त्याची पत्नी शुभांगी हे यजमान होते. शरद काका,प्रतापकाका, आमच्या आत्या, काकी,सर्व भावंडे त्यांची मुले अगदी दुसऱ्या पिढीपासून ते पाचव्या पिढीतील मुले आणि इतर आप्त-स्वकीय या छोटेखानी कार्यक्रमास उपस्थित होते.
सारेजण एकत्र अगदी अलगदपणे, सहजतेने वावरताना बघून अत्यंत आनंद होत होता. आज घरातील प्रत्येक जण स्वतःचे अस्तित्व वेगळेपण जपून आहे व आपापले आयुष्य यशस्वीरीत्या जगत आहे. आमच्या २० वर्षे आधीची पिढी स्वकर्तृत्वाने यशस्वी झालेली आहे हे पाहताना आनंद तर होताच पण सोबतच यातील काही दुवे निखळून पडले हे जाणवून मन गलबलून आले होते.याच अनुषंगाने पवार घराण्याच्या मागील पिढीवर एक कौटुंबिक पुस्तक लिहिण्याचा विचार मनात आला होता व तो या एकसष्टीच्या निमित्ताने पूर्णही झाला.पवार घराण्याचा इतिहास, यातील प्रत्येक व्यक्तिमत्व,मागील सारे उभारणीचे दिवस व माझी सख्खी-चुलत भावंडे या साऱ्यांविषयी लिहिताना मन भरून आले होते.तीच परिस्थिती यादिवशी पुस्तकाच्या काही भागाचे वाचन करताना होती.
वाढदिवशी औक्षण करताना घरातील सर्व स्त्रिया अगदी पत्नी सुनंदा पासून ते सर्व बहिणी, भावजया यांचे हात त्या ताटास लागले होते, मनात एक विशिष्ट आपलेपणाचा भाव होता की आज हे सर्वजण माझ्या एकसषष्ठीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत, सगळ्यांच्या शुभेच्छा, आशीर्वाद मला मिळत आहेत, खरंच आपण नशीबवान आहोत. हे सर्व पाहताना मन भावुक झाले होते पण एक खात्री ही वाटतेय की या सर्वातील हा आपलेपणा, ही एकसंधता इथून पुढील पिढ्यांमध्येही अशीच अखेरपर्यंत राहील..
. राजेंद्र पवार
१७ जून २०१८