जयंतरावांना राजू शेट्टींचा इशारा
कोल्हापूर : सांगली जिल्ह्यात चार कारखाने जयंत पाटील यांचे स्वत:चे, मोहनराव शिंदे व विश्वासराव नाईक चिखली व क्रांती कुंडल हे जयंत पाटलांच्या इशार्यावर चालणार्या सहकारी मित्रांचे, 4 कारखाने आ. विश्वजीत कदम यांचे म्हणजे जवळपास 16 पैकी 11 कारखाने हे जयंत पाटील व विश्वजीत कदम यांच्याकडे आहेत. त्यामुळे जयंत पाटील तुमची सुरु असलेली तिरकी चाल सरळ केल्याशिवाय गप्प राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी दिला.
जयसिंगपूर येथे बोलताना शेट्टी म्हणाले, ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यंदा कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी दराचा तोडगा काढावा या मागणीसाठी आंदोलन सुरू ठेवले आहे. सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदार एकत्रित येऊन यंदाच्या वर्षीची पहिली उचल 3100 रूपये ठरविले आहेत. यामध्ये सहा कारखान्यांची पहिली उचल एफ.आर.पी प्रमाणे 3200 पेक्षा जास्त जाते. पाच कारखान्यांची उचल एफ.आर.पी प्रमाणे 2450 ते 2700 रूपयापर्यंत आहे. मग जे पाच कारखाने 2450 पासून 2700 पर्यंत दर देतात त्या कारखान्यांना 3100 रूपये प्रतिटन म्हणजेच 400 पासून ते 650 रूपये प्रतिटन जादा दर देण्यास परवडते मग बाकीच्या 11 कारखान्यांना एफ.आर.पी पेक्षा 100 रूपये देण्यास का परवडत नाही.’
राजारामबापू, सोनहिरा, कुंडल या कारखान्याची रिकव्हरी चांगली असून या भागातील शेतकर्यांंनी 16 महिन्याचा आपला ऊस गाळपास पाठविलेला आहे. यामुळे या ऊसाला साखर उतारा चांगला मिळाला आहे. यामागे कारखाना प्रशासनाचे योगदान नसून शेतकर्यांचे योगदान आहे. राजारामबापू, वाटेगांव, कारंदवाडी, सोनहिरा, कुंडल, वसंतदादा, चिखली, निनाई हे कारखाने साखळी करून दर कमी देवू लागले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
राजारामबापू कारखान्याने कारखाना, बँक, पाणीपुरवठा संस्था, शाळा महाविद्यालयाचा स्टाफ, कामगार, शेतकरी यांच्याकडून जबरदस्तीने एफ.आर.पीमध्ये तुकडे करण्याचे अधिकारपत्र लिहून घेत आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्यांचे कोट्यवधींचे नुकसान होणार आहे. कारखान्याच्या काट्यावर आंदोलन झाल्यावर लाखो रूपयाचे नुकसानीचे राजू शेट्टी यांच्यासहित कार्यकर्त्यांच्यावर कारखान्याच्या सचिवामार्फत गुन्हे दाखल करून तुम्हाला समाधान मिळणार असेल तर आम्ही जामीनसुध्दा घेत नाही, तुमचं समाधान होईपर्यंत तुरूंगात राहतो; पण शेतकर्यांचे पैसे तेवढ बुडवू नका, असे शेट्टी म्हणाले.