साखर आयुक्तांच्या निर्णयाचे ‘स्वाभिमानी’कडून स्वागत

मात्र १७, १८ च्या ‘बंद’वर ठाम – राजू शेट्टी
पुणे : साखर कारखान्यांच्या वजन काट्यांबाबत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढलेल्या परिपत्रकाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वागत केले आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, मात्र इतर मागण्यांसाठी येत्या १७ आणि १८ नोव्हेंबर रोजीच्या ऊसतोड आणि वाहतूक बंदबाबत आम्ही ठाम आहोत, असे संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ‘शुगरटुडे’ला सांगितले.
ऊस वजनाबाबत साखर कारखान्यांकडून केल्या जाणाऱ्या सहा कृत्यांना अनुचित प्रथा ठरवत, यापुढे खासगी वजन काट्यांवर तोललेला ऊस सर्व कारखान्यांनी स्वीकारणे अपरिहार्य करणारे परिपत्रक साखर आयुक्त गायकवाड यांनी गुरुवारी काढले. हा ऐतिहासिक आणि दूरगामी परिणाम करणारा, शेतकऱ्यांना न्याय देणारा निर्णय आहे, अशा शब्दांत त्याचे स्वागत होत आहे. साखर कारखान्यांकडून मात्र यासंदर्भात तातडीने कोणतीही प्रतिक्रिया अधिकृतपणे व्यक्त करण्यात आलेली नाही.
या परिपत्रकाबाबत बोलताना, ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी म्हणाले, ‘‘या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मात्र आमच्या अन्यही महत्त्वाच्या मागण्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने साखरेबाबतचे आपले धोरण बदलणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही संघर्ष करत राहू. एफआरपी निश्चितीचे धोरण बदलावे लागणार आहे. ते जेव्हा जाहीर झाले तेव्हा इथेनॉलचा विषय नव्हता. आता अर्धी साखर इथेनॉलकडे वळवली जात आहे, त्याचा फायदा साखर कारखान्यांना होतो. तो शेतकऱ्यांनाही झाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्यासाठी आम्ही सरकारवर दबाव वाढवतच राहू,’’
महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनचे संपर्क प्रमुख सुखदेव फुलारी यांनीही या निर्णयाचे स्वागत केले. हा ऐतिहासिक आणि दूरगामी परिणाम करणारा, शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय आहे, असे ते म्हणाले.