रामगिरी शुगर्सची फसवणूक; पुण्यातील सात जणांविरोधात गुन्हा

बार्शी : बनावट कागदपत्रांच्या अधारे रामगिरी शुगर्सची जमीन परस्पर गहाण ठेऊन तब्बल दोन कोटी १० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील दोन महिलांसह सात जणांविरोधात बार्शी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीतन छटवाल (रा. अंधेरी मुंबई), स्व. देविदास सजनानी, वनिता सजनानी, दीपा सजनानी, मार्कस थोरात, केशव ईड्डा, विनित तापडिया (सर्व रा. पुणे, मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सीमा आंधळकर (रा. सौंदरे, ता. बार्शी) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, माझे पती सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर, उद्योजक स्व. शिवाजी डिसले, राजा स्वामी, देशमुख यांनी रामगिरी शुगर्स लि. खरेदी केला. त्यांनी मुंबईच्या टेंपल रोझ रिअल इस्टेट कंपनी मुंबई यांच्याशी करार करून ४९ टक्के शेअर्स देऊन कार्यकारी संचालक नेमणूक करण्यास मुभा दिली. कारखान्याच्या मुंबई कार्यालयाने बनावट बैठक दाखवून साखर कारखान्याची जमीन गट क्रमांक २९८,३४५,३५२,३५३,३८०, ३८२,३८५ अशी ३ लाख ८ हजार १०० स्क्वेअर मीटर जमीन मॉरगेज करण्याचे अधिकार केशव ईड्डा यांना दिले. त्यांनी श्रेयस इन्व्हेसमेंट प्रा.लि. विनित तापडिया यांना दिले.
बनावट कागदपत्रांचा वापर
तुळजापूर (जि. धाराशिव) येथील सब रजिस्टर कार्यालयात १६ ऑक्टोबर २०१५ रोजी बनावट कागदपत्राच्या आधारे दस्त तयार करून जमीन मॉरगेज केली. त्या कागदपत्रांच्या आधारे २ कोटी १० लाख रुपये उचलून कारखान्याच्या जमिनीवर बोजा चढवला आहे. बार्शीत बँक ऑफ बडोदा शाखेत खाते असताना परस्पर दुसऱ्या बँकेत अथवा फायनान्स कंपनीकडून रक्कम घेऊन फसवणूक केली आहे असे म्हटले आहे. ही घटना १८ एप्रिल २०११ ते २३ ऑक्टोबर २०१५ दरम्यान घडली.