आसवण्या/डिस्टिलरी उद्योग व त्यातून निर्माण होणारे स्पेंटवॉश : एक आढावा
ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगासमोर नेमक्या काय अडचणी आहेत, त्यावर कोणते दीर्घकालीन आणि लघुकालीन इलाज लागू होतात, धोरण दिशेबाबत उद्योगाची अपेक्षा काय आहे…. इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी साखर सहसंचालक, अभ्यासू अधिकारी आणि साखर क्षेत्रावरील अनेक पुस्तकांचे लेखक श्री. मंगेश तिटकारे लिहिताहेत ‘शर्करायन’ या नव्या सदरातून…. या दुसर्या लेखात त्यांनी स्पेंटवॉश निर्मितीचा आढावा घेतला आहे.
डिस्टिलरी/आसवणीत तयार होणार्या अल्कोहोल म्हणजेच मद्याचा इतिहास हा प्राचीन असून वेद काळातही म्हणजे साडेतीन हजार वर्षापूर्वी ऊसाचा रस आंबवणे/किण्वन आणि उर्ध्वपतन करून दारू मिळवण्याची प्रक्रिया माहिती होती. या दारूचा वापर यज्ञयागात, धार्मिक विधीत व सेवनासाठीही होत असे.
देशात 18 व्या शतकात 1805 साली कानपूर येथे M/s Carew Co. Ltd. यांनी सैन्यासाठी रम तयार करण्यासाठी पहिल्यांदा प्रकल्प सुरू केल्याची नोंद आहे. त्यानंतर 1835 सालात हिमाचल प्रदेशात सिमलानजीक कसौली येथे कसौली ब्रुअरी अँड डिस्टिलरी सुरु झाल्याची नोंद आहे. 1835 सालात ती ब्रुअरी होती, तर 1855 सालात तिचे डिस्टिलरीत रूपांतर झाले.
1970 दशकाच्या अखेरीस देशातील एकूण आसवण्यांची संख्या 60 होती. ती 1990 साला अखेरीस 230 होती. 2019-20 हंगाम अखेर देशात मळीवर आधारित 392 आसवण्या होत्या तर धान्य हा कच्चा माल वापरणार्या 142 आसवण्या कार्यरत होत्या. या आसवण्यांची उत्पादन क्षमता अनुक्रमे 700 कोटी लिटर्स प्रतिवर्षी व 506 कोटी लिटर्स प्रतिवर्षी होती.
——
डिस्टिलरीमधून निर्मित अल्कोहोलचे प्रकार :
1) मद्यार्क : R.S. अर्थात Rectified Spirit (95% ते 96% v/v ethanol) याचा वापर औद्योगिक कारणांसाठी मुख्यत्वे होतो. यात Ordinary व Special denatured spirit (ODS/SDS)) असे दोन प्रकार असतात. औषधे फार्मास्युटिकल्स, फ्लेवरिंग, विविध सेंद्रिय रसायने यांची निर्मिती केली जाते. रबर, किटकनाशके सॉल्व्हंटची उत्पादने होतात. इथिल अल्कोहोल हा अॅसिटिक अॅसिड, अॅसिटिक अनहायड्राईड, ब्युटॅनॉल, ब्युटाडीन, पॉली व्हिनाईल, क्लोराईड इत्यादी महत्वाची रसायनांची निर्मितीचा मुख्य स्रोत आहे.
2) अतिशुद्ध : Extra neutral Alcohol (ENA/Neutral spirit (96% vv ethonal) यातून पेय स्वरुपात Potable Alcohol चे प्रकार तयार केले जातात. विविध प्रकारच्या पेय दारु, व्हिस्की, रम, व्होडका इ. देशी/परदेशी दारुचे विविध प्रकार त्यातून केले जातात.
3) जलरहित इथेनॉल : पेट्रोलमध्ये मिश्रणासाठी तसेच औद्योगिक वापरासाठी तयार केले जाते.
——-
देशात तयार होणार्या अल्कोहोलपैकी 52% अल्कोहोलचा वापर पिण्यासाठी, तर 48% उपयोग औद्योगिक वापरासाठी होतो. या उद्योगाची वार्षिक उलाढाल अंदाजे 10 लाख कोटी रूपये असून साधारणत: 4 लाख लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार पुरवत आहे. देशाची आर्थिक व औद्योगिक प्रगती करण्यात मोठा हातभार आहे.
देशाच्या महत्वाकांक्षी इथेनॉल ब्लेंडिंग कार्यक्रमामुळे साखर उद्योग तयार होणार्या मळीची विल्हेवाट लावण्याची समस्या नुसती कमी झाली नाही तर, या इथेनॉलच्या पेट्रोलमधील मिश्रण करण्याने देशाने क्रुड तेल खरेदी करण्यावर खर्च होणारे बहुमूल्य परकीय चलनही वाचवले आहे. या वर्षाअखेर 15% मिश्रण करण्याचे उद्दिष्ट आहे. 2025 सालापर्यंत ई-20 उद्दिष्टांतर्गत 20% इथेनॉल मिश्रणासाठी 10.16 अब्ज लिटर्स इथेनॉल लागणार आहे. औद्योगिक वापरासाठी त्याशिवाय आणखी 13.50 अब्ज लिटर्स इथेनॉलची आवश्यकता भासणार आहे.
डिसेंबर 2023 अखेर देशात 1380 कोटी लिटर्स इथेनॉलची उत्पादन क्षमता तयार झाली असून, त्यापैकी 875 कोटी लिटर्स क्षमता मळीवर आधारित आहे, ती साखर कारखान्यांनी उभारली आहे. तर 505 कोटी लिटर्स इथेनॉलची क्षमता धान्यांवर आधारित आसवण्यांची आहे. सन 2013 ते 2021 या 8 वर्षात इथेनॉल खरेदीसाठी OMC नी (ऑईल मार्केटिंग कंपन्या) देशातील साखर कारखान्यांना तब्बल 81,796 कोटी रुपये दिले आहेत. त्याचा उपयोग ऊस उत्पादक शेतकर्यांचे वेळेवर एफआरपी देण्यासाठी कारखान्यांना झाला आहे.
तसेच इथेनॉल मिश्रणामुळे या 8 वर्षातील पेट्रोलमुळे होणारे देशातील कार्बन उत्सर्जन 318.2 लाख टनांनी कमी झाले आहे व देशाचे रु. 53,894 कोटी रुपयाचे, क्रुड तेल खरेदीसाठी लागणारे बहुमूल्य परकीय चलन वाचले आहे. 2025 सालाचे 20% इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्याचे उद्दिष्ट पाहता आणखी 980 कोटी लिटर्स क्षमता उभारावी लागेल. हे पाहता या उद्योगाचे पुढील कालावधीतील महत्व अधोरेखित होते.
आसवण्यामध्ये वापरल्या जाणार्या मळीचा दर्जा, किण्वन अर्थात फर्मंटेशनसाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान व बाष्पीभवन तंत्रज्ञान (Distillation Technique) यावरुन 1 लिटर अल्कोहोल उत्पादनामागे निर्माण होणारा द्रवरुप कचरा, कच्चा स्पेंटवॉश तयार होण्याचे प्रमाण साधारण: 8 ते 16 लिटर इतके आहे. नव्या आधुनिक आसवण्यात हे 8 लिटर इतके प्रमाण राहते, तर जुन्या आसवण्यात 16 लिटरपर्यंत जाते. यावरुन देशातील आसवण्यांमध्ये किती मोठ्या प्रमाणात स्पेंटवॉश तयार होते याची कल्पना आपण करु शकतो.
पूर्वी केलेल्या एका सर्वेक्षणात, देश पातळीवर मळीवर आधारित 325 आसवण्या प्रत्येक वर्षी साधारणत: 3063 दशलक्ष लिटर वेगवेगळ्या प्रकारच्या अल्कोहोलची निर्मिती करतात आणि हे करताना अंदाजे वार्षिक 45945 दशलक्ष लिटर, स्पेंटवॉशची टाकाऊ पदार्थ/कचरा म्हणून निर्मिती करतात असे आढळून आले. यात अत्यंत घातक, जलप्रदूषण, दुर्गंधीयुक्त स्पेंटवॉश प्रक्रिया करुन त्यास निसर्गात सोडण्यायोग्य, पर्यावरणपूरक स्वरूप देणे हे एक मोठे आव्हान आहे.
उत्पादन प्रक्रिया :
मळीवर आधारित आसवण्यांमध्ये बॅच पद्धतीने, सतत पद्धतीने किंवा जैवस्थिर पद्धतीने मळीचे किण्वन करून अल्कोहोलची निर्मिती केली जाते, तर अल्कोहोलच्या उत्पादनानंतर आसवणी व त्यातील प्रक्रियानुसार 8 ते 16 पट स्पेंटवॉशची निर्मिती टाकाऊ द्रव पदार्थ या रुपाने होते.
स्पेंटवॉश निर्मिती
गेल्या दशकात आसवणी डिस्टिलरी युनिट्सच्या वाढत्या विस्ताराबरोबर डिस्टिलरीतून मोठ्या प्रमाणात निर्माण होणार्या घातक घनकचरा विल्हेवाटीची वाढती समस्या निर्माण झाली आहे. हा कचरा अर्थात स्पेंटवॉश हे अतिशय दुर्गंधीयुक्त अत्यंत प्रदूषित द्रव आहे.
पर्यावरणीय प्रभाव :
स्पेंट वॉश नदी, नाले, ओढे यात प्रक्रिया न करता सोडल्याने पाण्यातील वनस्पती, जलचर तसेच जीवजंतूंवर तसेच माशांच्या जीवनावर अत्यंत घातक परिणाम होतो. सांडपाण्यात असलेले उज, मिथेन व नायट्रस ऑक्साईड देखील हरितगृह वायू उत्सर्जनाचे स्रोत आहेत. दुर्गंधीयुक्त वास असलेले प्रदुषित पाणी जमिनीत झिरपणे, पर्यायाने चांगल्या जमिनी क्षारपड, खराब होणे हेदेखील प्रमुख चिंतेचे व प्रदूषणाचे विषय आहेत. स्पेंट वॉश मधील उच्च सीओडी, एकूण नायट्रोजन आणि फॉस्फेट सामग्रीमुळे नैसर्गिक पाणवठ्यांचे युट्रोफिकेशन होऊ शकते. यात पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण खूप कमी होत जाते व जलसाठा निकामी होतो. पर्यायाने पर्यावरण धोक्यात येते.
गेल्या दशकात आसवणी/डिस्टिलरी युनिट्सच्या वाढत्या विस्ताराबरोबर घनकचरा विल्हेवाटीची वाढती समस्या निर्माण झाली आहे.
आसवणींवर Water (Prevention controll Pollution) Act 1974, Air (Prevention controll Pollution) Act 1981 व Hazardous Wastes (MH) Rules 1989 अन्वये या कायद्यांतर्गंत प्रदूषणविषयक निर्बंध घातले गेले आहेत. त्यामुळे या उद्योगास काटेकोरपणे वेळोवेळी सुधारणा झालेल्या मागदर्शक तत्वांच्या निर्देशांचे पालन करावे लागते. रु. 150 कोटीवर भांडवली गुंतवणूक असलेल्या भारतातील मळीवर आधारित डिस्टिलरी आता ‘रेड श्रेणी’मध्ये वर्गीकृत केल्या आहेत. पर्यावरण संरक्षणासाठी कॉर्पोरेट जबाबदारीच्या जाहीरनाम्यानुसार (CREP – CPCB) भारतातील सर्व डिस्टिलरींना आता ‘झिरो लिक्विड डिस्चार्ज’ (ZLD) अर्थात झिरो प्रदूषण साध्य करणे आवश्यक आहे.
1) बायोमिथेनायझेशन पद्धत – (बायोडायजेस्टर)
या प्रकारात अल्कोहोल निर्मितीनंतर तयार झालेला स्पेंट वॉश थंड व स्थिर केल्यानंतर (cooling) बायोमिथेनेशन प्लांटला दिला जातो. MEE अर्थात मल्टिपल इफेक्ट इव्हॅपोरेटरद्वारे बाष्पीभवन स्पेंटवॉशमध्ये असलेले 30% पर्यंत घनघटक (Solids) वर केंद्रित केले जाते. हे द्रव concentrate करुन बायोकंपोस्ट केले जाते. इतर उर्वरित सांडपाणी योग्य तंत्रज्ञानाच्या Condensed Polishing Unit (CPU) मध्ये प्रक्रिया केले जाते. या पुर्नप्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर आसवणींमध्ये मळी पातळ करण्यासाठी अथवा कुलिंग टॉवरमध्ये केला जातो.
देशातील 70 – 80% आसवण्यांनी स्पेंटवॉशवर प्राथमिक उपचार म्हणून बायोमिथेनायझेशनचा मार्ग स्वीकारला आहे. हा चांगल्या पद्धतीने प्रस्थापित झालेल्या आसवणीतील क्षमता स्पेंटवॉशवर प्रक्रिया करण्याचा मार्ग असून यातून बहुमुल्य बायोगॅसची निर्मिती होते. 30 KLPD पर्यंत बायोमिथेनायजेशन पद्धत आता वापरता येईल. त्यापुढील क्षमता किंवा विस्तारासाठी इन्सीरनेशन बॉयलरचा वापर क्षमतेनिहाय बंधनकारक केला आहे.
2) बायोमिथेनायजेशन – रिव्हर्स ऑसमॉसिस पद्धत (RO)
या प्रकारात अल्कोहोल निर्मितीनंतर तयार झालेला कच्चा स्पेंटवॉश थंड झाल्यावर (Cooling) बायोमिथेनेशन प्लांटला दिले जाते. हा स्पेंटवॉश प्रथम रिव्हर्स ऑसमॉसिस (RO) मेम्ब्रेन प्लांटमध्ये केंद्रीत केला जातो. MEE अर्थात मल्टीपल इफेक्ट इव्हेपोरेटरद्वारे RO प्लांटमधून नाकारलेले / Reject झालेल्या 30% घन पदार्थांवर केंद्रीत केले जाते. Concentrate करुन प्रेसमड केक सारख्या फिलर सामग्रीसह जैव कंपोस्ट केले जाते. रिजेक्ट केलेले घटक, पाणी योग्य तंत्रज्ञानाच्या कंडेन्सेट पॉलिशिंग युनिटमध्ये (CPU) प्रक्रिया केले जाते व प्रक्रिया केलेले पाणी मळी पातळ करण्यासाठी किंवा कुलिंग टॉवरमध्ये वापरले जाते.
(3) बायोमिथेनायजेशन, RO, MEE पद्धत
या पद्धतीत कच्चे स्पेंटवॉश प्रथम एकात्मिक अर्थात Integrated multiple effect evaporator मध्ये केंद्रीत केला जातो. हा केंद्रीत झालेला स्पेंटवॉश थंड झाल्यावर बायोमिथेनेशन प्लांटला दिला जातो. त्यानंतर रिव्हर्स ऑसमॉसिस प्रक्रिया (RO) केली जाते व हा स्पेंटवॉश मेंम्ब्रेन प्लांटमध्ये केंद्रीत केला जातो. RO मधून नाकारलेला स्पेंटवॉश प्रेसमड केकसह MEE मध्ये म्हणजे Multiple Effect Evaporator मध्ये बाष्पीभवनासाठी केंद्रीत केला जातो. कंडेन्सेट केला जातो. हे प्रक्रिया केलेले सांडपाणीवर नंतर Condensed Polishing Unit (CPU) मध्ये प्रक्रिया केली जाते व मळी पातळ करणे किंवा कुलिंग टॉवरसाठी हे पुर्नप्रक्रिया केलेले पाणी वापरले जाते.
(4) Incineration Boiler वापर पद्धत
या प्रक्रियेत कच्चा स्पेंटवॉश हा MEE plants च्या सहाय्याने पहिला केंद्रीत (concentrate) केला जातो. हा केंद्रीत केला स्पेंटवॉशमधील 55 ते 60% न विरघळलेला घटक हे भुसा, कोळसा किंवा तांदूळ काढल्यावर राहिलेला कोरडा बायोमास (rice husk) यांच्या सहाय्याने जाळण्यात येतो. त्यासाठी विशिष्ठ पद्धतीने तयार केलेला Incineration boiler वापरला जातो. उच्चदाबाची पाण्याची वाफ इन्सिनरेशन बॉयलरमध्ये टर्बाइनमधून जाताना तयार होते. ती वाफ प्रोसेसिंगसाठी आसवणी व MEE प्लांटमध्ये वापरली जाते. टर्बाइनमधून सहवीज तयार होते, त्यातून आसवणीचे कामकाज चालवले जाते. या प्रक्रियेत राहिलेले सांडपाण्यावर कंडेन्सेट पॉलिशिंग युनिट (CPU) मध्ये प्रक्रिया केली जाते. हे पाणी प्रक्रियेनंतर पुर्नवापरासाठी, मळी पातळ करण्यासाठी, कुलींग टॉवरसाठी वापरात आणले जाते.
(5) लो ग्रेड पोटॅश, Incineration Boiler
या पद्धतीत कच्चा स्पेंटवॉश थंड झाल्यानंतर प्रथम बायो-मिथेनेशन प्लांट (Bio-methanation plant) कडे पाठविले जाते. हे स्पेंटवॉश प्रक्रियेनंतर त्यातील 40 ते 45% घनपदार्थ MEE अर्थात Multiple effect evaporator च्या सहाय्याने केंद्रीत केले जातात. केंद्रीत केलेला स्पेंटवॉश स्पेशन ड्रायर सिस्टिमद्वारे वाळलेल्या पावडरमध्ये रुपांतरीत केला जातो. या स्पेशल ड्रायर सिस्टीममध्ये स्प्रे किंवा टिन फ्लॅश किंवा ATFE (Agitated Thin Film Evaporator) असते. वाळलेली पावडर ही कमी ग्रेड पोटॅश म्हणून विकता येते किंवा बॉयलरमध्ये सहायक इंधन जसे कोळसा/भुसा/ rice husk द्वारे जाळली जाते. प्रक्रियेनंतर उरलेले सांडपाणी हे CPU (Condensed Polish Unit) मध्ये पुर्नवापरासाठी घेतले जाते. याद्वारे मळी पातळ केली जाते किंवा कुलिंग टॉवरमध्ये हे प्रक्रिया केलेले पाणी वापरता येते.
(6) स्पेंटवॉशमधून FCO ग्रेड पोटॅश मिळवणे/De Potash/विनासे मिळवणे
हा नवीन FCO ग्रेड पोटॅश खत मिळवण्याची पद्धत असून पोटॅशरहीत विनासे (de-potash vinasse/DPV) ही या पद्धतीने द्राव्य खत मिळू शकते. या पेंटेटेड तंत्रज्ञानात MEE प्रक्रियेद्वारे व सहाय्याने स्पेंटवॉशमधील 25% घन पदार्थांचे केंद्रिकरण करण्यात येते. केंद्रीत केलेला स्पेंटवॉश हे Pertreatment स्टेप्समधून जातो. Coagulation (गोठणे), Clarification (स्वच्छ करणे), गाळणे filteration प्रक्रिया करुन या स्पेंटवॉश मधील नको असलेले इनऑरगॅनिक पदार्थ, घनकचरा काढला जातो.
त्यानंतर प्रक्रिया केलेल्या व केंद्रीत केलेल्या स्पेंटवॉशवर Insoluble Potassium Salt (Residue/Adeof) व Lean spent वॉश मिळवण्यासाठी प्रक्रिया केली जाते. पोटॅशियम सॉल्टवर FCU ग्रेट पोटॅश खत मिळवण्यासाठी (KCL/K2SO4/KNO3/KH2PO4) रिक्शन, फिल्ट्रेशन, इव्हॅपोरेशन व ड्राईंग या स्टेप्स वापरुन प्रक्रिया केली जाते. lean spent वॉशवर प्रक्रिया करुन द्रव स्वरुपात De-Potash/Vinasse (DPV) (TS : 50 – 60%) मिळते.
MEE (Multiple Effect Evaporation) या बाष्पीभवन प्रक्रियेत मिळालेले कन्डेन्सेटेड स्टीम/वाफ ही CPU म्हणजे Condensate Polish Unit मध्ये प्रक्रिया करुन सदर प्रक्रिया केलेले सांडपाणी हे मळी पातळ करण्यासाठी किंवा कुलिंग टॉवरमध्ये वापरले जाते. ही पद्धत बायोमिथेनेशन प्रकाराने सुद्धा केली जाते. आसवणींतील प्रदूषण कमी करण्यासाठी वरील मान्यताप्राप्त पद्धतींचा स्वीकार ज्या त्या कारखान्याने आपापल्या संस्थेचा अभ्यास, प्रतिष्ठित मान्यताप्राप्त संस्थेद्वारे तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता, कार्यक्षमता तपासून करावयाची आहे.
आसवणीत वापरल्या जाणार्या तीन पद्धतीनुसार परंपरागत “सी” हेवी मळीपासून कच्च्या स्पेंटवॉशची वैशिष्टे
बायोस्टील पद्धती जुन्या डिस्टिलरीजमध्ये वापरली जात असे. यात एकच फरमेंटर असतो व तयार झालेला स्पेंटवॉश recycle केल्याने स्पेंटवॉशचे प्रमाणे तुलनेने कमी रहाते. केवळ इथेनॉल निर्माण करणार्या उद्योगांसाठी ही पद्धत कमी स्पेंटवॉश निर्माण करण्याच्या दृष्टीने अजून चांगली आहे. ज्या डिस्टिलरीतील अल्कोहोल हे दारू, IMFL लिकर बनविण्यासाठी वापरले जाते तिथे बॅच, फीडबॅच/कास्केड पद्धतीने डिस्टीलेशन दारूच्या चवीसाठी आवश्यक रहाते.
उत्तर प्रदेशाची देशी दारू उद्योगासाठी निश्चित राखीव कोटा पद्धत
देशात मळी, दारु हा राज्य सरकारांच्या अखत्यारीतील विषय आहे. उत्तर प्रदेशमध्ये 28 सहकारी, 3 शासनाने चालवलेल्या व 104 खासगी अशा 158 आसवण्या असून राज्यात Sugarcane Molasses Policy खूप वर्षांपासून चालू आहे. त्यानुसार तेथील देशी दारू उद्योगांना डिस्टीलरींनी निर्माण केलेल्या अल्कोहोलपैकी काही प्रमाणात साठा राखून ठेवावा लागतो. 2023-24 सालासाठी हा कोटा प्रति फॅक्टरी उत्पादीत केलेल्या साठ्याच्या 19 टक्के होता, तर मागील वर्षी 20 टक्के व त्या मागील वर्षात तो 18 टक्के होता. यामुळे सरकारला assured VAT मिळत आहे व डिस्टिलरींनाही दारुसाठी अल्कोहोल विक्री केल्याचा दराचा फायदा होतो.
मळी/दारु विक्रीमध्ये अबकारी कर/VAT वसुलीत 2019-20 सालात उत्तर प्रदेश राज्याने 31517 कोटी रुपये महसूल जमा केला होता, तर त्या वर्षात महाराष्ट्रात अबकारी कर वसुलीत जमा झालेला महसूल तो 17477 कोटी रुपयांचा होता.
शासनाने दिली भरीव मदत
6% व्याज अनुदान किंवा व्याजदराचे 50% यापैकी जी कमी ते अनुदान देणारी केंद्रीय योजना Scheme for extending financial assistance to sugar mills for enhancement augmentation of ethanol production capacity 2018 अंतर्गत डिस्टिलरी उभी करणे किंवा विस्तारीकरणे करणार्या आसवणींना ZLD साध्य करणे, इन्सीरनेशन बॉयलर घेणे, अशा सारखी भरीव योजना आखण्यात आली. या योजनेनुसार देशातील 800 साखर कारखान्यांना डिसेंबर 2023 अखेर 713 कोटी व्याज अनुदान देण्यात आले आहे. या योजनेचा फायदा घेणार्या आसवणींना उत्पादित इथेनॉलच्या 75% इथेनॉल OMCs ला विकण्याचे बंधन आहे. त्याशिवाय अल्कोहोल विकण्यांबाबत इतर कोणतेही बंधन राज्यातील आसवण्यांवर नाही.
साखर तयार करताना निर्माण होताना स्पेंट वॉश/प्रेसमड मधून तयार होणारा बायो CNG
बायो CNG हा ऊर्जेचा अक्षय स्रोत आहे. साखर कारखान्यांत पारंपरिक पद्धतीत स्पेंटवॉश बायोडायजेस्टरला फीड केल्यानंतर बायोमिथेनेशन प्रक्रिया सुरु होते. त्यापासून बायोगॅस तयार होतो. हा बायोगॅस पाईपलाइनद्वारे बॉयलरला पाठवला जातो. या गॅसमध्ये 55% ते 60% मिथेन वायू असतो तर उर्वरित कार्बनडायऑक्साईड वायू (CO2) व हायड्रोजन सल्फाईड H2S वायू 3% पर्यंत असतो. हे दोन्ही वायू वेगवेगळे केल्यास शुद्ध हायड्रोजन सल्फाईड हे गंधकाचे घनस्वरुप तयार करता येते. जे शेतासाठी वापर करावयाच्या खतामध्ये वापरता येते. या पध्दतीत निर्माण झालेल्या कार्बनडायऑक्साईड वायू (CO2) हा हवेत सोडला जाण्याचे मोठे प्रमाण आहे. परंतु हवेत न सोडता Value additional म्हणून या शुध्द (CO2) वायुचे काय करता येईल यावर ही संशोधने सुरू आहेत.
प्रेसमड वापरून तयार होणार्या बायोगॅस वर त्यानंतर CBG तयार करताना गॅसमध्ये असलेल्या हायड्रोजन सल्फाईडचे प्रमाण बायोमिथेनेशन पद्धत वापरुन केलेल्या CBG मध्ये 10 पटीने कमी आहे व तुलनेत गॅसनिर्मितीचे प्रमाणही जास्त आहे, असे निरीक्षण आहे. भारतातील 13 राज्यांमधील साखर कारखान्याशी संलग्न 44 बायो – CNG संयुगामधून दिवसाला 2,18,000 KG बायो – CBG गॅसची उत्पादन क्षमता 2023 हंगामात होती.
देशात गुजरात राज्याची बायो – CNG गॅसची उत्पादन क्षमता देशात सर्वात जास्त 49028 KG/प्रतिदिन आहे. त्यानंतर पंजाब राज्याची क्षमता 34000 KG/प्रतीदिन व महाराष्ट्र राज्याची क्षमता 28690 KG/प्रतिदिन इतकी आहे. देशात सरासरी 300 दशलक्ष मे.टन ऊस उत्पादनाच्या गाळपानंतर 3.5% प्रेसमड धरल्यास 10 दशलक्ष मे.टन प्रेसमड CNG गॅस उत्पादनासाठी वळवला जाऊ शकतो. बायो – CNG वापराने हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी होते. बायोगॅस गाळून कार्बनडायऑक्साईड वायू व हायड्रोजन सल्फाईड वायू काढून त्यानंतर कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CNG) व बायोमिथेन वायू तयार केला जातो.
साखर कारखान्यांत बायो – CNG प्लांट केंद्र सरकारकडून 2018 साली सुरू केलेल्या सस्टेनेबल प्लांट उभा करण्यास अल्टरनेटिव्ह टुवर्ड्स अफोर्डेबल ट्रान्सपोर्ट (SATAT) या योजने अंतर्गत अनुदान इतर सवलती मिळतात. 4.8 टन प्रतीदिवस क्षमतेचा प्लॅट उभारण्यासाठी 15 कोटी रुपयापर्यंत साधारण खर्च येतो त्यापैकी 3 कोटी रुपयापर्यंत अनुदान सवलती या योजनेत मिळतात. या योजनेअंतर्गत 2024 सालापर्यंत 5000 बायो – CNG देशभरात स्थापनेची या वर्षअखेर केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. कारखान्यांनी स्वत:चा CNG इंधनाचा वितरणाचा पंप उभा करणे, MNRE अनुदान अशा अनेक चांगल्या सवलती उपलब्ध आहेत.
ऑईल मार्केटिंग कंपन्यांना बायो-सीएनजी तयार करणार्या साखर कारखान्यांच्या जवळ कारखान्यांनी निर्माण केलेल्या बायो सीएनजी गॅस भरण्यासाठी (Injection) पाईप लाईनचे जाळे उभे केल्यास कास्केड खरेदी साठी कारखान्यांना जसा खर्च करावा लागतो, तसा करावा लागणार नाही. याशिवाय वाहतूक खर्चात बचत होईल. गळतीचा प्रश्न सुटेल व या उद्योगास प्रोत्साहनही मिळेल. भविष्यात तसे नियोजन होणेही आवश्यक आहे. 1 सेट सिलेंडर कास्केडमध्ये 60 सिलेंडर्स असतात व यात 700 kg गॅस बसू शकतो. कारखान्यांना असे सेट खरेदी करावे लागतात. प्रति कास्केडसाठी कारखान्यांना करावा लागणारा 25 लाख पर्यंत प्रत्येकी सेट मागे खर्च कमी होऊ शकतो.
देशातील सर्वात मोठी डिस्टिलरी
देशातील सर्वात मोठी डिस्टिलरी एम.आर.एन.निराणी ग्रुप ऑफ कंपनीज, मुधोळ, बागलकोट येथील कारखान्याची 700 KLPD उत्पादन क्षमता आहे. शुगर सिरप व “बी” हेवी सिरपपासून इथेनॉल तयार करण्यासाठी आहे. या ग्रुपच्या कारखान्यांची एकूण उत्पादन क्षमता 1450 KLPD इतकी देशातील दुसर्या क्रमांकाची आहे. श्री रेणुका ग्रुप ऑफ कंपनीज, कर्नाटक मधील 3 कारखान्यांची अथणी, हवालगा व पुनोली यांची एकत्रित अल्कोहोल उत्पादन क्षमता 1550 KLPD ही सर्वात मोठी आहे. वारणा सहकारी साखर कारखान्याने 2012 साली प्रेसमड व स्पेंट वॉश वापरून बायो सीएनजी गॅस तयार करणारा प्लांट राज्यात पहिल्यांदा चालू केला. सध्या तो स्पेक्ट्रम एनर्जी लिमिटेड कोडोली (कोल्हापूर) येथे स्थित PPP भागीदारी तत्त्वावर चालू आहे.सध्या त्याची क्षमता शंभर टीपीडी बायो- सीएनजी आणि सेंद्रिय खते निर्माण करण्याची आहे.
\\\
राज्यातील आसवण्यांचा तपशील (मार्च 2024 अखेर)
देशातील मळीवर आधारीत 392 आसवण्यांपैकी सर्वाधिक 153 आसवण्या महाराष्ट्रात आहेत. यात सहकारी तत्वावरील 77, खासगी तत्वावरील 55 व स्टँड अलोन युनिट्स 21 आहेत. सध्यस्थितीत महाराष्ट्रातील सर्वात मोठी कार्यरत डिस्टिलरी बारामती अॅग्रो लि., शेटफळगढे, युनिट 1, इंदापूर, जि.पुणे यांची असून 440 KLPD-Rectified Spirit / मद्यार्क 160 KLPD-Ena व 600 KLPD- इथेनॉल उत्पादन दै. हजार/लिटर त्यांची आहे. यानंतर अयान मल्टिस्टेट (बाणगंगा), भूम, जि.धाराशिव यांनी ठी-400 KLPD व इथेनॉल 500 KLPD अशी उत्पादन क्षमता आहे. गंगामाई इंडस्ट्रीज व कन्स्ट्र. (शेवगांव, जि. अहमदनगर) यांची RS-400 KLPD, 90-एपर KLPD व इथेनॉल 500 KLPD अशी अल्कोहोल उत्पादन क्षमता आहे.
यानंतर दौंड शुगर प्रा.लि., आलेगाव, ता.दौंड, जि.पुणे यांची RS-370 KLPD, Ena-120 KLPD व 370 KLPD – इथेनॉल अशी उत्पादन क्षमता आहे. यानंतर पाचव्या क्रमांकावर विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि., पिंपळनेर, माढा, जि.सोलापूर यांची ठी-300 KLPD, Ena-140 KLPD व इथेनॉल 300 KLPD उत्पादन क्षमता आहे. भविष्यात इथेनॉलवर आधारीत 600 KLPD चे अनेक प्रकल्प महाराष्ट्र राज्यात येत आहेत.
साखर कारखान्यांतून निर्मित सांडपाणी अर्थात स्पेंटवॉशचे मूल्य
देशातील डिस्टिलरी 45 अब्ज लिटर स्पेंटवॉश (सांडपाणी) तयार करतात. ज्याचे वार्षिक मूल्य रु. N, P, K व S च्या संदर्भात 500-700 कोटी रुपये होईल. सूक्ष्म पोषक आणि सेंद्रिय पदार्थासाठी 150 -170 कोटी रुपये होईल. वार्षिक पर्यावरण खर्चात 100 कोटींची बचत, मत्स्य व्यवसायाचे 100-140 कोटींचे नुकसान, पाणी उपचार खर्चात 500 कोटींची बचत, सार्वजनिक आरोग्यासाठी 100 कोटीची तरतूद देशातील डिस्टिलरीमधून तयार होणार्या 45 अब्ज लिटर स्पेंट वॉशमध्ये 1,200 दशलक्ष घनमीटर बायोगॅस (60% मिथेन असलेले) तयार करण्याची क्षमता आहे. दरवर्षी असाही अंदाज लावला गेला आहे की, स्पेंट वॉशच्या वापरामुळे वार्षिक 5 ट्रिलियन कॅलरी ऊर्जा मिळू शकते आणि मिथेनेटेड सांडपाणी दरवर्षी 2,45,000 टन पोटॅशियम, 12,500 टन नायट्रोजन आणि 2,100 टन फॉस्फरस प्रदान करू शकतात आणि एक वर्षाच्या पोटॅशियमची पूर्तता करु शकतात.