साखर, इथेनॉलच्या किमतीत सुधारणा करा

ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन संघटनेचे केंद्र सरकारला निवेदन
नवी दिल्ली : सध्याच्या उत्पादन खर्चाच्या अनुषंगाने साखर आणि इथेनॉलच्या किमतीच्या आधारभूत किमतीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. एफआरपी आता ऊस उत्पादन खर्चाच्या १०५.२ टक्के आहे. एफआरपीमध्ये वाढ झाल्यामुळे उसाला सर्वात फायदेशीर पीक म्हणून आपले स्थान टिकवून ठेवण्यास मदत झाली आहे. पण त्याचवेळी प्रक्रिया उद्योगाची आर्थिक व्यवहार्यता देखील तितकीच महत्त्वाची असल्याचे ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल विठलानी यांनी केंद्राला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन या साखर संघटनेने नुकतेच केंद्र सरकारला याबाबतचे निवेदन दिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, वाढता उत्पादन खर्च आणि साखर कारखान्यांवरील आर्थिक दबाव लक्षात घेता साखरेची एमएसपी अर्थात किमान आधारभूत किंमत आणि इथेनॉलच्या किमतीत सुधारणा करण्याची विनंती केली आहे. फेब्रुवारी २०१९ पासून साखरेची किमान आधारभूत किमत प्रति किलो ३१ रुपये रुपयावर कायम आहे. २०२३-२४ पासून उसाच्या रसापासून बनवलेल्या इथेनॉल आणि ‘बी-हेवी’ मोलॅसेसची किंमत (एक्स-मिल) अनुक्रमे ६५.६० रुपये प्रति लिटर आणि ६०.७० रुपये प्रति लिटरवर कायम ठेवण्यात आली आहे. उसाची एफआरपी किंमत ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या २०२५-२६ हंगामासाठी १५ रुपयांची वाढ करून ३५५ रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, २०१९ पासून उसाच्या एफआरपीमध्ये २९ टक्के वाढ (नवीनतम वाढीसह) करण्यात आली आहे. गेल्या सहा वर्षांत वेतन, रसायने, वाहतूक, पॅकिंग साहित्य इत्यादी कच्च्या मालाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. म्हणून साखरेच्या किमान आधारभूत किमतीचे सध्याच्या किमतीशी जुळवून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे साखर व्यापार संघटनेने म्हटले आहे.