माळी शुगर, जयहिंद शुगरसह चार कारखान्यांवर ‘आरआरसी’नुसार कारवाई
पुणे : दी सासवड माळी शुगरसह चार साखर कारखान्यांवर, एफआरपी थकबाकी प्रकरणी साखर आयुक्तांनी ‘आरआरसी’ अंतर्गत कारवाई केली आहे. या कारखान्यांवर मालमत्ता जप्तीची नौबत येऊ शकते.
धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील लोकमंगल माउली साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या उसाचे ५ कोटी ३८ लाख, वाशी तालुक्यातील भीमाशंकर शुगर मिल्सकडे ६ कोटी ८९ लाख, सोलापूर जिल्ह्यातील दि सासवड शुगर माळीनगर या कारखान्यांकडे १५३ कोटी, तर जय हिंद शुगर आचेगाव या कारखान्यांकडे ७ कोटी ८८ लाख रुपये थकबाकी आहे.
गाळप उसाचे १४ दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करणे बंधनकारक असताना हंगाम बंद होऊन चार महिन्यांचा कालावधी लोटला तरी शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. सोलापूर प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाच्या अहवालावरून साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी या चार कारखान्यांवर आरआरसीची कारवाई केली आहे.
सरलेल्या हंगामात शेतकऱ्यांचे पैसे थकविणाऱ्या जिल्ह्यातील विठ्ठल कॉर्पोरेशन म्हैसगाव, विठ्ठल रिफायनरी करमाळा, मातोश्री लक्ष्मी शुगर, अक्कलकोट, सहकार शिरोमणी वसंतराव काळे, पंढरपूर, आदिनाथ करमाळा व धाराशिव जिल्ह्यातील श्री तुळजाभवानी साखर कारखान्यांवर आरआरसीनुसार कारवाई साखर आयुक्तांनी यापूर्वीच केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांनीही शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे दिले नाहीत. मात्र साखर सहसंचालकांना खोटी माहिती देऊन कारवाई थांबवली असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते.
१५ टक्के व्याजासह रक्कम द्याकारखान्यांकडे शिल्लक असलेली बँकेला तारण न दिलेली साखर तसेच बगॅस मोलॅसिस विक्री करून शेतकऱ्यांचे पैसे १५ टक्के व्याजासह देण्यात यावेत, असे साखर डॉ. खेमनार यांनी आदेशात नमूद केले आहे.
साखर कारखान्याने एफआरपी रक्कम वेळेत न दिल्यास, ‘आरआरसी’ म्हणजे सक्तीची महसुली वसुली नियमानुसार, कारखान्याची मालमत्ता विकून शेतकऱ्यांचे पैसे देण्याचा अधिकार साखर आयुक्तांना आहे.