एका उसाची किंमत रू. ३३; सरकारच आहे खरेदीदार
मदुराई: तामिळनाडूमध्ये सध्या पोंगल सणाच्या तयारीची धामधूम जोरात आहे. त्यासाठी सरकारकडून ऊस खरेदी केला जात आहे, तोही तब्बल ३३ रूपये प्रति नग दराने. अर्थात त्याचे प्रमाण सणापुरतेच आहे,
पोंगल सणाला येथे अनन्यसाधारण महत्त्व असते. गृहिणी मंडळी सणाला जी पूजा मांडतात, त्यासाठी ऊस अनिवार्य असतो. म्हणून उसाची मोठ्या प्रमाणावर खरेदी होते. रेशन दुकानांच्या माध्यमातून उसाचे वितरण केले जाते.
तामिळनाडू नागरी पुरवठा महामंडळाकडून रेशन दुकानांमधून पोंगलसाठी पूजा आणि अन्य आवश्यक साहित्यांचे कीट दिले जाते. त्यात अनेक वर्षांपासून उसाचाही समावेश आहे. ‘पोंगल गिफ्ट हॅम्पर’ असे त्याला म्हणतात.
एकट्या मदुराई जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना महामंडळाकडून सुमारे दहा लाख ऊस वितरित केला जाणार आहे. अधिका-यांनी सांगितले की, सरकारने खरेदीची किंमत 33 रुपये प्रति ऊस ठरवली आहे. त्यासाठी काही निकषही निश्चित केले आहेत. हा ऊस किमान सहा फूट लांब असावा. पाचट काढून स्वच्छ केलेला असावा.
‘‘आम्ही सरकारच्या निर्देशानुसार उसाची खरेदी सुरू केली आहे आणि प्रत्येक कार्डधारकाला एक ऊस दिला जाईल,” असे सहकारी संस्थांचे सहनिबंधक एस गुरुमूर्ती यांनी सांगितले.
दरम्यान, एका शेतकऱ्याने सांगितले की, सरकार देत असलेला दर पुरेसा नाही; पण सर्व शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडूनही स्पर्धात्मक बोली मिळणार नाही. तो 27 रुपयांपर्यंत असेल. ज्या व्यापाऱ्यांनी मेलूर भागात तळ ठोकला आहे तेथील शेतकऱ्यांना प्रति उसाला 30 रुपये भाव मिळण्याची शक्यता आहे.
तिरुनेलवेली आणि तुतीकोरीन जिल्ह्यांमध्ये अनपेक्षित पुराचा परिणाम खरेदीवर होण्याची शक्यता आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दक्षिण तामिळनाडूतून येणारे व्यापारी स्पर्धात्मक किंमत देतात, असेही ते म्हणाले. इरोड आणि तिरुपूर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये बहुतांश उसाची लागवड होत असली, तरी व्यापारी मदुराईमध्ये लागवड केलेल्या ऊसाला पसंती देतात.
शिधापत्रिकांधारकांखेरीज इतर नागरिकांनाही मोठ्या प्रमाणावर उसाची गरज पडते. ती व्यापाऱ्यांकडूनही भागवली जाते. म्हणजे पोंगलच्या निमित्ताने सध्या काही दिवसांसाठी का होईना उसाचा दर प्रति टन रु. ९५०० ते १० हजार रुपयांपर्यंत जात आहे.