*Yes Yes* व्यक्तिमत्त्व!

दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन (इंडिया) अर्थात ‘डीएसटीए’चे अध्यक्ष, एस. एस. इंजिनिअर्स या नामवंत कंपनीचे संस्थापक आणि साखर उद्योग क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व श्री. शहाजीराव भड अर्थात एस. बी. भड यांचा 1 जून रोजी वाढदिवस. त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप शुभेच्छा!
1980 साली स्थापन झालेल्या त्यांच्या एस. एस. इंजिनिअर्सने पन्नासवर साखर कारखाने (टर्न की प्रकल्प), तीनशेवर मिल्स, 50 वर सहवीजनिर्मिती प्रकल्प, 120 बॉयलर्स अशा प्रकल्पांची उभारणी करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. प्रख्यात बजाज हिंदुस्थान या कंपनीच्या प्रत्येकी दहा हजार टन प्रति दिन गाळप क्षमता असलेल्या तीन युनिटचाही त्यात समावेश आहे.
श्री. भड यांनी 1972 मध्ये पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरची पदवी घेतली. चांगले गुण घेऊन पास झाल्याने नोकरीचा प्रश्न सुटला होता. वालचंद नगर इंडस्ट्रीजमध्ये डिझाईन इंजिनिअर म्हणून शहाजीराव भड रुजू झाले. तिथे साधारण पाचेक वर्षे काम केले. त्यानंतर त्यांनी जे.पी. मुखर्जी अॅन्ड असोसिएटमध्ये सल्लागार म्हणून काही काळ काम केले. या अनुभवाच्या जोरावर त्यांनी स्वतःची सल्लागार कंपनी सुरू केली.
काही वर्षे उद्योगांना तांत्रिक सल्ला दिल्यानंतर ते प्रत्यक्ष उत्पादन क्षेत्रात उतरले. अंगभूत संशोधक वृत्ती, सतत नवनव्या कल्पनांचा पुरस्कार आणि त्या तडीस नेण्यासाठीची जबरदस्त इच्छाशक्ती या गुणांच्या जोरावर श्री. भड यांनी भोसरी एमआयडीसीत ’एस.एस इंजिनियर्स’ या स्वतःच्या कंपनीची तुटपुंज्या भांडवलावर स्थापना केली. कंपनी नावारूपास आणण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. आज एस. एस. इंजिनिअर्स साखर उद्योग इंजिनिअरिंग क्षेत्रातील आघाडीचे नाव आहे. ‘टर्न की प्रोजेक्ट्स’मध्ये एस. एस. इंजिनिअर्सचा विशेष दबदबा आहे. आज एस. एस. इंजिनिअर्समध्ये अभियंते, संशोधकांसह शेकडो लोक काम करतात..

पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीच्या भोसरी एमआयडीसीतील ही कंपनी जागतिक पातळीवर नावाजलेली कंपनी बनली आहे. श्री. भड यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीने यशोशिखर गाठले आहे. श्री. भड मूळचे बार्शी तालुक्यातील (जि. सोलापूर) गौडगांवचे. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत शेताच्या बांधावरून सुरू झालेला त्यांचा प्रवास अनेक संकटांवर मात करत ग्लोबल उद्योगापर्यंत पोहचला आहे. त्यांची जीवनगाथा तरूण पिढीसाठी केवळ मार्गदर्शकच नाही, तर सदैव प्रेरणादायी आहे. ‘शून्यातून विश्वनिर्मिती’ ही उपमा ज्यांना शोभून दिसते, त्यात श्री. भड यांचे नाव अग्रणी आहे. त्यांनी प्रचंड कष्टातून हे विश्व निर्माण केले आहे, त्यामुळे त्यांचे स्थान अढळ तार्यासारखेच आहे.
दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असो. (इंडिया) या नामांकित संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी श्री. भड 2022 पासून सांभाळत आहेत. त्यांनी सूत्रे स्वीकारल्यापासून संस्थे मध्ये अनेक लोकाभिमुख बदल केले. बरीच नवी मंडळी संस्थेला जोडली. नवनवीन उपक्रम हाती घेतले. त्यातून संस्थेची राखीव गंगाजळी वाढवली.
ते जेथे जेथे हात घालतात, तेथे यशाचे नवे मापदंड निर्माण करतात. डीएसटीएमध्येही त्यांनी आपल्या कल्पकतेने आणि नेतृत्व कौशल्याने संस्थेला नवे आयाम दिले आहेत. सकारात्मक विचार, धाडसी वृत्ती, सदैव कामात गुंतवून ठेवण्याचा स्वभाव, साखरेपेक्षाही मधुर वाणी, तरीही निर्णय कठोरता, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती, कल्पकता, निर्णय क्षमता, दुर्दम्य इच्छाशक्ती, आत्मविश्वास आणि यशाच्या शिखरावर जाऊनही जमिनीशी कायम नाते जपण्याचा स्वभावगुण… अशी त्यांची काही वैशिष्ट्ये सांगता येतील.
त्यांच्या स्वभावात नेहमीच ‘येस’ असते. नो किंवा ‘नाही’ हे त्यांच्या शब्दाकोशातच नाही. म्हणून त्यांना Yes Be (S.B.) इनिशियल उत्तमपणे शोभते. तसेच त्यांच्या कंपनीचे नाव ही डबल एसने सुरू होते. म्हणजे प्रत्येक गोष्ट सकारात्मक. त्यांना उत्तम आरोग्यासह उदंड आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!