कार्यकारी संचालकांच्या अन्य बाबींबद्दलही ठोस निर्णय घ्यावा
सेवानिवृत्त कार्यकारी संचालकांना, वयाच्या ६५ व्या वर्षांपर्यंत मुदतवाढ देण्यास मंजुरी देणारा आदेश राज्य सरकारने नुकताच जाहीर केला. त्यानंतर त्यावर साधक-बाधक चर्चा सुरू झाली आहे. या क्षेत्रातील जाणकार श्री. साहेबराव खामकर यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे, ती खालीलप्रमाणे..
- (१) सहकारी साखर कारखान्यांमध्ये अपवाद वगळता केवळ आपल्याच राज्यामध्ये शासन मान्यताप्राप्त नामतालिकेवरील उमेदवाराची कार्यकारी संचालक पदी नेमणूक करण्याचे बंधन आहे.
- (२) तथापि, कार्यकारी संचालकांची नेमणूक व राजीनामा या दोन्ही गोष्टींचे अधिकार कारखाना व्यवस्थापनास आहेत.
- (३) त्यामध्ये कार्यकारी संचालक पदासाठी नामतालिका तयार करण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा, वेळोवेळी न्यायालयात आव्हानीत होत असल्यामुळे ब-याच वेळा लवकर निर्णय न झाल्यामुळे नामतालिकेवर येऊन देखील काहींना सेवा कालावधी फारच कमी मिळतो व त्यामुळे नवीन नामतालिकेसाठी परीक्षादेखील लवकर होत नसल्यामुळे आणि वयाच्या अटींमुळे पात्रता असूनही ब-याच उमेदवारांना त्यापासून वंचित राहावे लागते ही वस्तुस्थिती आहे.
- (४) यापूर्वीही कार्यकारी संचालकांच्या सेवानिवृत्ती विषयी वेगवेगळ्या सरकारच्या काळात वेगवेगळे शासन निर्णय पारित झालेले आहेत.
- (५) या शासन निर्णयामध्ये मुदतवाढ देण्यासाठी किमान बारा अटींच्या पूर्ततेची आवश्यकता असल्याचे नमूद आहे. जे पूर्वीच्या शासन निर्णयामध्ये देखील होतेच.
- (६) तरी देखील या अटी – शर्ती डावलून संचालक मंडळाने ठराव पारित करून मुदतवाढ मंजुरीसाठी साखर आयुक्तालया ने नकारात्मक शिफारस देऊनही शासनाकडे पाठविलेले प्रस्ताव शासनाने मंजूर केल्यामुळे न्यायालयाने ते फेटाळले असल्याचेही उदाहरण आहे.
- (६) साखर कारखान्यांनी शासन निर्णयास अधीन राहूनच ठराव पारित करून मुदतवाढ प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविणे योग्य राहील,अन्यथा जाणूनबुजून चुकीचे प्रस्ताव पाठविल्याबद्दलची जबाबदारी संचालक मंडळावर निश्चित करणे सयुक्तिक होईल; कारण या विरुद्ध जो कोणी सभासद न्यायालयात आव्हान देतो त्याचा खर्च त्यास वैयक्तिक करावा लागतो, संचालक मंडळ मात्र कारखान्याचे वतीने खर्च करतात.
- या बाबत माझे मत पुढील प्रमाणे व्यक्त करीत आहे.
- (१) कार्यकारी संचालक नामतालिकेवरील अनेक उमेदवारांमधून एकाची निवड करण्याचे स्वातंत्र्य संचालक मंडळाला आहे, त्यामुळे त्यांना योग्य ती व्यक्ती ऊपलब्ध होऊ शकते.
- (२) अगदी संचालक मंडळाला, आहे त्याच व्यक्तीस ठेवायचे असेल, तर मुदतवाढ न देता गरजेनुरूप त्यांचा मोबदला देऊन सल्ला घ्यावा की जेणेकरून जे नामतालिकेवर जे उमेदवार आहेत त्यांना काम करण्यास काही कालावधी मिळेल व आपले कामाचे कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल.
- (३) काही ठिकाणी मुदतवाढ देण्याऐवजी अन्य पदाची निर्मिती केली जाते, त्यामुळेदेखील तेथे कार्यकारी संचालक पदावर काम करणा-या व्यक्तींना काही अंशी ठोस निर्णय घेण्यास अडचणीचे ठरते, मात्र जबाबदारी पदावरील व्यक्तीवरच राहते.
- (४) शासनाने कार्यकारी संचालकांचे फक्त सेवानिवृत्ती वयाच्या बाबतीत निर्णय करणे बरोबरच त्यांची नेमणूक, राजीनामा, अधिकार,सेवा संरक्षण आदी बाबत काही ठोस निर्णय घेण्याची गरज वाटते.
साहेबराव खामकर
संस्थापक-अध्यक्ष, नवदीप सोशल फाउंडेशन, पुणे