शेतकरीहितासाठी कारखाना सुरू झाल्याचे समाधान : पंकजा मुंडे

परळी वैजनाथ : शेतकरी हितासाठी आता कारखाना सुरू झाला आहे. याचे समाधान मानत ओंकार शुगर प्रायव्हेट लिमिटेडच्या रूपाने वैद्यनाथ साखर कारखान्याचा पुनर्जन्मच झाल्याची भावना राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा वैद्यनाथ कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. ओंकार शुगर प्रायव्हेट लिमिटेडच्या गळीत हंगामाचा शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. मंत्री पंकजा मुंडे यांच्या शुभहस्ते नुकताच मोळी टाकून उस गाळपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ओंकार शुगरचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी, शेतकरी सभासदवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना पंकजा मुंडे काहीशा भावुक होत त्या म्हणाल्या की, शेतकऱ्यांच्या जीवनात विकासात्मक आर्थिक क्रांती आणण्याच्या दृष्टिकोनातून लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी आपल्या भागात वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. या कारखान्याला चौथ्या अपत्याप्रमाणे जपले. आपणही शेतकऱ्यांच्या हितासाठीच सदैव तसाच प्रयत्न केला. आपला कारखाना सुरू आहे ही समाधानाची बाब आहे. एक प्रकारे चौथ्या अपत्याच्या पालन पोषणाची जबाबदारी दुसऱ्याच्या हातात देऊन त्याची होणारी उपासमारच आपण थांबवली आहे, त्यामुळे ओंकार शुगरच्या रूपाने वैद्यनाथचा हा पुनर्जन्मच झाला आहे.
या गळीत कारखाना यशस्वीरित्या गाळप पूर्ण करणार असून दहा लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गाळपामध्ये आपला कारखाना उच्चांक गाठेल, असा आपल्याला विश्वास वाटतो. २०१४ नंतर माझ्या खांद्यावर कारखान्याची जबाबदारी आली. ती प्रामाणिकपणे पार पाडून कारखाना सुरू ठेवण्याचा व शेतकऱ्यांचे हित जपण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला. मात्र साखर कारखानदारीवर आलेले आर्थिक संकट, अनेक आर्थिक अडचणी, बँकांचे कर्ज यामुळे अडचणी वाढत गेल्या. त्याचप्रमाणे इतर कारखान्यांना मदत झाली; मात्र आपल्या कारखान्याला मदत होऊ शकली नाही. त्यामुळे मी शेवटपर्यंत स्वतः पदरमोड करून हा कारखाना सुरू ठेवण्यासाठी धडपड केली. कर्जाचा डोंगर व आर्थिक संकट इतके मोठे होते की अनेक वर्ष कारखाना ताळेबंद होऊन गंजून गेला असता. त्यापेक्षा कारखाना आता सुरू आहे आणि शेतकरी व ऊस उत्पादकांचा ऊस या ठिकाणी गाळप होणार आहे.





