‘विघ्नहर’कडून साडेआठ लाख साखर पोते उत्पादन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पूणे : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात शनिवारअखेर ७ लाख ७६ हजार ७१० टन उसाचे गाळप पूर्ण करून, ८ लाख ५६ हजार ५०० साखर पोत्यांचे उत्पादन केले. साखर उतारा ११.२४ टक्के इतका मिळाला, आणखी काही बरेच दिवस हंगाम चालणार असल्याने साखर उत्पादन वाढेल, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष सत्यशीलदादा शेरकर यांनी दिली.

शेरकर म्हणाले, विघ्नहर कारखान्याचा गळीत हंगाम ३ ऑक्टोबर २०२३ रोजी सुरू झाला. कार्यक्षेत्रातील जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील उसाची तोडणी क्रमवारीने सुरू आहे. ३०७८ हेक्टरवरील उसाची तोडणी बाकी आहे. यातून १ लाख ६० हजार टन उसाचे गाळप होऊ शकेल.

यासाठी एक महिन्याचा कालावधी लागू शकतो. सन २०२४-२५ या गाळप हंगामासाठी ३८८० हेक्टरवर आडसाली उसाची लागवड झाली आहे. ५३१ हेक्टर उसाची पूर्वहंगामी लागवड झाली असून २९० हेक्टर सुरू उसाची लागवड झाली आहे. २१७० हेक्टरवर खोडवा उसाची नोंद झाली आहे. पुढील वर्षासाठी ६८७१ हेक्टर उसाचे क्षेत्र कारखान्याकडे नोंदले गेले आहे, असेही चेअरमन शेरकर यांनी सांगितले.

विघ्नहर कारखान्याकडे नोंदलेल्या उसापैकी सर्व उसाचे गाळप केले जाणार आहे. कारखाना बाजारभावापेक्षा अधिक दर देत असल्याने शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करावी. लागवड केलेल्या सर्व उसाची नोंदणी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याकडे करावी, असे आवाहन सत्यशीलदादा शेरकर यांनी केले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »