ऊसतोडीसाठी आलेल्या परप्रांतीय अल्पवयीन मुलींवर अत्याचार

बीड : जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ऊसतोडणीसाठी छत्तीसगड राज्यातून आलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर स्थानिक नराधमांनी अत्याचार केल्याची घटना माजलगाव ग्रामीण परिसरात २४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ च्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
याप्रकरणी किराणा दुकानदार आणि ट्रॅक्टर चालकावर गुन्हा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गणेश राजेभाऊ घाटूळ (किराणा दुकानदार) आणि अशोक भास्कर पवार (ट्रॅक्टर चालक) अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, ‘जर ही गोष्ट कोणाला सांगितली तर जीवे मारून टाकू, अशी धमकी आरोपींनी पिडीत मुलींना दिली होती. या दहशतीमुळे घाबरलेल्या मुलींनी सुरुवातीला कोणालाही काही सांगितले नाही. मात्र, २८ डिसेंबर रोजी हिंमत एकवटून पीडित मुलींनी आपल्या नातेवाईकांना आपबीती सांगितली. त्यानंतर पीडित कुटंबीयांनी पोलिसांत अरोपींविरोधात तक्रार दिली होती.
नेमकी घटना काय?
छत्तीसगडमधील १४ ऊसतोड मजूर कुटुंबे माजलगाव परिसरात कामासाठी आली आहेत. २४ डिसेंबर रोजी पीडित मुलींचे कुटुंबीय शेतात कामासाठी गेले होते. यावेळी दोन्ही अल्पवयीन मुली झोपडीत एकट्याच असल्याचा फायदा घेत आरोपींनी त्यांना जबरदस्तीने ओढत नेले. गणेश घाटूळ याने एका मुलीला उसाच्या शेतात, तर अशोक पवार याने दुसऱ्या मुलीला कपाशीच्या शेतात नेऊन त्यांच्यावर अत्याचार केला.
पोलिस कारवाई
पीडित मुलींनी हा प्रकार सांगितल्यानंतर कुटुंबाने तातडीने माजलगाव ग्रामीण पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
सुरक्षेचा प्रश्नऐरणीवर
या घटनेमुळे स्थलांतरित ऊसतोड मजुरांच्या, विशेषतः महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. नराधमांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत असून बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.






