साखर उद्योगाचे भवितव्य इथेनॉलच : घाटगे
कोल्हापूर : इथेनॉल हेच आता साखर उद्योगाचे भविष्य आहे. हे जाणून शाहूने इथेनॉल निर्मितीला प्राधान्य दिले आहे. त्या अनुषंगाने इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेतले आहे. हा विस्तारित इथेनॉल प्रकल्प फेब्रुवारी 2024 पर्यंत कार्यान्वित होईल, असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले.
या प्रकल्पाचे भूमिपूजन खास समारंभात विधिवत झाले, त्यावेळी घाटगे बोलत होते.
घाटगे म्हणाले, केंद्र सरकार साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीस प्रोत्साहन देत आहे. भविष्यात ते जास्त प्रमाणात इंधनात मिसळण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. भविष्यात इथेनॉलवर चालणारी वाहने येतील. त्यासाठी पहिला इथेनॉल पंप शाहू कारखाना उभा करेल. त्यामुळे साखरेपेक्षा इथेनॉल निर्मितीमध्ये साखर कारखान्यांना फायदा होणार आहे, ही दूरदृष्टी ठेवून कारखान्याने या प्रकल्पाचे विस्तारीकरण हाती घेतले आहे.
कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे यांची तर राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, सर्व संचालक, बिद्रीचे संचालक बाबासाहेब पाटील, सुनीलराज सूर्यवंशी, राजे बँकेचे चेअरमन एम.पी.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.