कर्नाटक सरकारच्या समितीवर शेखर गायकवाड
पुणे : साखर आणि इथेनॉलबाबत नवी धोरण ठरवण्यासाठी कर्नाटक सरकारने एक उच्चस्तरीय समिती गठित केली असून, त्यावर महाराष्ट्राचे निवृत्त साखर संचालक शेखर गायकवाड (भाप्रसे) यांची नियुक्ती केली आहे.
यासंदर्भात कर्नाटक सरकारने नुकतेच एक परिपत्रक काढून तज्ज्ञ समितीचे गठण केले आहे. या परिपत्रकात म्हटले आहे की, नवीन साखर कारखाने आणि इथेनॉल उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी ऊस हा प्रमुख घटक आहे. त्यामुळे उसाची, तसेच पाण्याची उपलब्धता तपासणे, केंद्र सरकारच्या नव्या नियमांनुसार दोन कारखान्यांमधील अंतराची अट आदी मुद्यांवर सखोल विचार करण्याची गरज आहे. म्हणून यासंदर्भात तज्ज्ञांकडून शास्त्रीय/तंत्रशुद्ध अहवाल सादर होणे आवश्यक आहे, असे सरकारचे मत आहे. त्यासाठी ही समिती स्थापन करण्यात येत आहे.
समितीमध्ये दहा सदस्य असून, कर्नाटकचे वाणिज्य व उद्योग सचिव अध्यक्ष असतील. महाराष्ट्रातून गायकवाड यांच्याखेरीज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे डॉ. संजय पाटील यांचीही सदस्यपदी नियुक्ती केली आहे. या समितीचे पहिली बैठक निजलिंगाप्पा शुगर इन्स्टिट्यूट येथे नुकतीच पार पडली.
श्री. शेखर गायकवाड हे ‘शुगरटुडे’ मासिकाचे मार्गदर्शकही आहेत.