पोटातल्या पोराच्या नावाने जमीन, सिलिंग कायद्यावर अशीही हुशारी
भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त अधिकारी शेखर गायकवाड (आयएएस) म्हणजे उत्तम प्रशासक, उत्तम संवादक, उत्तम निर्णय क्षमता, उत्तम निरीक्षण शक्ती, उत्तम लेखक, उत्तम विनोदबुद्धी इ. अनेक गुणांचा मिलाफ… त्यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय कारकीर्दीत अनेक लोकाभिमुख कामे करताना, त्यांना काही गमतीशीर अनुभवदेखील आले. ते त्यांनी शब्दबद्ध केले आहेत, ते विनोदी शैलीत असले, तरी सामाजिक वास्तव मांडणारे आहेत… त्यावर आधारित सदर ‘प्रशासकीय रंगढंग’ खास ‘शुगरटुडे’ मॅगेझीनच्या वाचकांसाठी….
महाराष्ट्रात जमीन सिलिंग कायदा आला आणि मोठमोठ्या जमीनदारांचे धाबे दणाणले. जो तो आपापली जमीन कशी वाचवता येईल, याचा विचार करायला लागला. आता सीलिंग कायदा आला, की जिरायती जमीन ५४ एकर, हंगामी बागायत ३६ एकर, आणि कॅनॉल बागायत १८ एकर जमीन फक्त एका कुटुंबाला ठेवता येते, अशा दररोज वेगवेगळ्या बातम्या वृत्तपत्रात गाजू लागल्या. समाजातल्या इतर लोकांना काही कळण्यापूर्वीच आपला स्वार्थ कसा साधता येईल, अशी काळजी घेणारे गाव पुढारी तयारीमध्ये होते.
एका गावातल्या किसनराव नावाच्या जिल्हा परिषदेच्या पुढाऱ्याने त्याची जमीन कशी वाचवता येईल, यासाठी वकिलांकडे हेलपाटे मारायला सुरुवात केली. मंत्रालयात जाऊनसुद्धा माझी जमीन कशी वाचवता येईल, अशी त्याने अधिकाऱ्यांना भेटून विचारणा केली. नुकतेच तीन-चार वर्षांपूर्वी लग्न झालेल्या किसनरावला दोन वर्षांचा छोटा मुलगा होता. नवरा बायको आणि अज्ञान मुलगा यांचे खाते एकत्र धरले जाईल व सगळे मिळून फक्त ५४ एकर जिरायती जमीन त्याला स्वतःकडे ठेवता येईल, असा त्याला सल्ला मिळाला. त्याच वेळी त्याची बायको हंसाबाई गरोदर होती. त्यामुळे किसनरावच्या डोक्यात एक सुपीक आयडिया आली.
न जन्मलेल्या मुलाच्या नावाने सुद्धा आताच मी जमिनीचे वाटप करून दिले तर काय होईल, असा त्याने विचार केला. त्याला वकिलांकडून असे सांगण्यात आले, की तुझा एकमेव मुलगाच आत्ता दोन वर्षांचा आहे. त्याला जमीन वाटून दिली तरी तो अज्ञान असल्यामुळे त्याचे स्वतंत्र खाते धरले जाणार नाही. परंतु सीलिंग कायदा लगेच झाला नाही आणि मुलगा सज्ञान झाल्यावर जर लागू झाला तर तुला उपयोग होऊ शकेल. निदान मुलाच्या नावाने दावा लावून तो अज्ञान आहे असे दाखवून कोर्टामध्ये दहा-पंधरा वर्षे लढून काहीतरी धडपड तुला करता येईल. परंतु दुसऱ्या मुलाचा तर अजून जन्मच झालेला नाही तर कोणत्या नावाने तू जमिनीचे वाटप करणार? त्यावर परत किसनरावाने डोके चालवायला सुरुवात केली. आठ दिवस अनेक लोकांशी चर्चा केल्यावर न जन्मलेल्या मुलाचे नाव त्याने ‘किरण’ ठेवले. हे नाव असे होते की मुलगा झाला तरी चालेल आणि मुलगी झाली तरी हेच नाव चालेल.
एवढे अद्भुत डोके चालवणारी माणसे आपल्याकडे असल्यामुळे जगात कोणत्याही देशातल्या लोकांना जे सुचणार नाही त्याचा अद्भुत शोध आपल्या लोकांनी लावला आहे. सीलिंग कायदा आल्यावर अशाच पद्धतीने एकत्र राहणाऱ्या नवरा बायकोने बरोबरच कोर्टात जाऊन संमतीने घटस्फोट घेतल्याची, न जन्मलेल्या मुलांच्या नावाने जमीन केल्याची, माँटी किंवा बंटी या कुत्र्यांच्या नावाने जमिनी केल्याची असंख्य उदाहरणे असल्याचे जुनी व ज्येष्ठ मंडळी बोलतात ते उगाच नाही.
गावकारभाऱ्यांपुढे शिक्षणाचा काय उपयोग
१९५२ च्या दुष्काळात भीषण पाणीटंचाई सरकारने या काळात लोकांना रोजगार मिळण्यासाठी दुष्काळी कामे काढली, गावच्या खडकाळ जमिनी असलेल्या डोंगरामध्ये दोन नाला बंडिंग आणि एका गाव तलावाचे काम सुरू झाले.
दुष्काळ संपल्यावर झालेल्या पहिल्याच पावसांत सर्व नाला बंडिंगची कामे व गाव तलाव पाण्याने पूर्ण भरून गेले. गाव तलावाच्या कडेने खडकाळ जमिनी असल्यामुळे साचलेल्या पाण्याचा फारसा उपयोग गावकऱ्यांना होत नव्हता. कधीतरी गुरे चारायला नेणारे गुराखी जनावरांना पाणी पाजण्यासाठी या तलावाचा उपयोग करीत. गावात अजित नावाचा एक तरुण मुलगा शेती शास्त्रामध्ये शिक्षण घेऊन आपल्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करू लागला होता. चांगली शेती करायची तर पाण्याची गरज होतीच.
गाव तलावापासून ४०० मीटर अंतरावर असलेल्या त्याच्या शेतापर्यंत पाइपलाइन घेऊन जाता येईल असा त्याने विचार केला. ग्रामपंचायतीला तसा अर्ज देण्यापूर्वी त्याने सरपंचाशी चर्चा करण्याचे ठरविले. सरपंचाने एवढ्या लांब पाइपलाइन करण्याचा खर्च किती येईल आदी तपशील विचारला. नाहीतरी गावातील तलावाचे पाणी पडून राहण्यापेक्षा आपल्याला जमीन बागायत करू द्यावी, अशी अजितने विनंती केली.
शेवटी सरपंचांनी येत्या ग्रामपंचायत बैठकीमध्ये मी हा विचार बोलून दाखवतो. इतर ग्रामपंचायत सदस्यांचे मत काय पडते हे आपण पाहू असे अजितला सांगितले.
प्रत्यक्षात ग्रामपंचायत बैठकीमध्ये अजितच्या मागणीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. गाव तलावातले पाणी हे एका खातेदाराला देऊ केल्यास इतर सर्व खातेदार सुद्धा अशाच प्रकारची मागणी करतील व त्या वेळी ग्रामपंचायतीला नाही म्हणणे शक्य होणार नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने अजितला पाणी नाही देता येणार, असे सांगावे असे एकमताने ठरले.
शेती शास्त्रातले अद्ययावत ज्ञान घेऊन आलेल्या व स्वतःची जमीन मॉडर्न तंत्रज्ञानाने विकसित कशी करता येईल, याचे शिक्षण अजितने घेतले होते. मात्र गावचे निर्णय कसे होतात याचे अजितला शिक्षण कमी होते. शेती कशी अद्ययावत करावी हा अजितचा विचार बेरकी गावकऱ्यांनी हाणून पाडला होता.