मेढे सरांच्या मार्गदर्शनामुळेच शक्य झाले : शिंदे यांच्या भावना
![Vishwajit Shinde, Datta Shirol Sugar](https://i0.wp.com/sugartoday.in/wp-content/uploads/2025/02/shinde-datta-shirol-thumbnail-e1739275053158.jpg?fit=768%2C435&ssl=1)
कोल्हापूर : साखर उद्योगातील तज्ज्ञ पी. जी. मेढे सर यांचे मार्गदर्शन आणि स्व. सा. रे. पाटील म्हणजे आमचे अप्पासाहेब यांचे कार्यसंस्कार यांमुळेच मी आज सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक (एमडी) पॅनलसाठी झालेल्या परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊ शकलो, अशी भावना विश्वजित विजयसिंह शिंदे यांनी व्यक्त केली.
‘शुगरटुडे’ने त्यांचे खास अभिनंदन करण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, ‘‘स्व. सा. रे. पाटील यांच्या तालमीत आम्ही घडलो, त्यांचेच बोट धरूनच पुढे जात गेलो. आज २७ वर्षे झाली मी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना (शिरोळ) येथे सेवेत आहे. पदोपदी त्यांची आम्हाला आठवण येते. मी आज जो की आहे तो अप्पासाहेबांमुळेच. त्यांच्या आग्रहामुळेच मला विदेशात जाता आले. अमेरिकेत तब्बल दीड महिना राहून तेथील साखर कारखानदारी, डिस्टिलरी उद्योग आणि शेती अत्यंत जवळून पाहता आली. मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. त्यांचा मी कृतज्ञ आहे.’’
मेढे यांचे मार्गदर्शन
एमडी परीक्षेत प्रथम आल्याचे गुपित उघड करताना, श्री. शिंदे म्हणाले की, ‘‘श्री. मेढे यांनी सतत पाठपुरावा करत माझ्याकडून एमडी परीक्षेची तयारी करून घेतली. अर्ज भरल्यापासून ते सातत्याने तयारी करवून घेत होते. अगदी विद्यार्थ्यांना क्लासमध्ये समजावून सांगावे, नोट्स काढून द्याव्यात, तसे ते मार्गदर्शन करत. त्यांनी यासाठी ऑनलाइन क्लासही घेतले. स्वत: नोट्स तयार करून सर्वांना पाठवत असत. आज एमडी पॅनलमध्ये निवड झालेले सर्व ५० उमेदवार मेढे सरांचे विद्यार्थी आहेत हे मी अभिमानाने नमूद करतो.’’
‘शुगरटुडे’चेही आभार
एमडी पॅनल प्रक्रियेचा सुरुवातीपासून पाठपुरावा करत वृत्तांकन केल्याबद्दल त्यांनी ‘शुगरटुडे’चेही आभार मानले. एमडी चाळणी परीक्षेतही मी प्रथम आलो होतो, ही बातमीदेखील ‘शुगरटुडे’नेच दिली होती याची आठवणही श्री. शिंदे यांनीच यानिमित्ताने करून दिली.
शिंदे यांच्याबद्दल थोडक्यात…
श्री. विश्वजित शिंदे सध्या श्री दत्त साखर कारखान्यामध्ये प्रॉडक्शन मॅनेजर पदावर कार्यरत आहेत.
बी.एस्सी. (केमिस्ट्री), एमबीए (एचआर), पीजीडीआयएसएचई, एम. फिल. असे त्यांचे शिक्षण असून, त्यांनी आतापर्यंत अनेक पुरस्कार पटकावले आहेत.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि भारतीय शुगरने त्यांना ‘बेस्ट चिफ केमिस्ट’ पुरस्काराने गौरवले आहे. त्यांनी १२ रिसर्च पेपरदेखील सादर केले आहेत आणि त्यातील चार रिसर्च पेपर्सना पुरस्कार मिळाले आहेत. कोल्हापूर येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या बोर्ड ऑफ स्टडीजचे ते सदस्य आहेत.
‘शुगरटुडे’च्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा!