‘विघ्नहर’वर पुन्हा शेरकरांचेच वर्चस्व

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे  : देशभर नावलौकिक असलेल्या, जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत पुन्हा सत्यशीलदादा शेरकर यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले. त्यांच्या शिवनेर पॅनेलच्या तब्बल १७ जागा बिनविरोध आल्यानंतर, उर्वरित चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत स्वत: शेरकर याच्यासह चारही उमेदवार प्रचंड मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत.

मतमोजणीला रविवारी (दि. १६) सकाळी सुरुवात झाल्यानंतर साडेअकराच्यादरम्यान सर्व निकाल हाती आले. पहिला निकाल ओबीसी गटाचा लागला. यामध्ये शिवनेर पॅनेलचे सुरेश भीमाजी गडगे ९ हजार ९२० मतांनी विजयी झाले, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार रहेमान इनामदार यांना अवघी ११६ मते मिळाली. या गटातील दुसरे उमेदवार नीलेश भुजबळ यांना २२१ मते मिळाली होती.

शिरोली गटामध्ये सत्यशील शेरकर यांना १० हजार ४२३ सर्वाधिक मते मिळाली. या गटातील सुधीर खोकराळे यांना १० हजार ५७, तर संतोष खैरे यांना १० हजार २५ मते मिळाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली.

एकूण मतदानापैकी ९९७ मते अवैध ठरली. कारखान्याचे एकूण सभासद १९ हजार ६२७ असून, यांपैकी १० हजार ६१७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

दरम्यान, या निवडणुकीसाठी एकूण ६६ अर्ज दाखल झाले होते. छाननीमध्ये ४ अर्ज बाद झाले होते. शिल्लक ६२ पैकी ३७ जणांनी माघार घेतली होती.

जुन्नर गटामधून अशोक घोलप, देवेंद्र खिलारी व अविनाश पुंडे हे तिघे बिनविरोध निवडून आले. ओतूर गटामधून धनंजय डुंबरे, बाळासाहेब घुले, रामदास वेठेकर व पंकज वामन हे चौघे बिनविरोध निवडून आले आहेत. पिंपळवंडी गटामधून विवेक काकडे, प्रकाश जाधव व विलास दांगट हे तिघे बिनविरोध निवडून आले आहेत. घोडेगाव गटामधून यशराज काळे, नामदेव थोरात व दत्तात्रय थोरात हे तिघे बिनविरोध निवडून आले आहेत. महिला गटामधून नीलम तांबे व पल्लवी डोके या बिनविरोध निवडून आल्या आहेत. अनुसूचित जाती/जमाती गटामधून प्रकाश सरोदे तसेच विमुक्त जाती/जमाती या गटामधून संजय खेडकर हे बिनविरोध निवडून आले आहेत.

दरम्यान, विघ्नहर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आमदार शरद सोनवणे, भाजप नेत्या आशाताई बुचके, माजी आमदार अतुल बेनके, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे यांनी मदत केली.

विघ्नहरच्या निवडणुकीमध्ये शेतकरी संघटनेने सत्यशील शेरकर यांना बिनशर्त पाठिंबा दिला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले होते. सत्यशील शेरकर भविष्यकाळामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतील यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा दिला असल्याचे शेतकरी संघटनेचे नेते अंबादास हांडे यांनी सांगितले.

विजयी उमेदवार

Vighnahar Sugar Election
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »