साखर आयुक्तपदाचा कार्यभार अनिल कवडे यांच्याकडे
पुणे : राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर, वरिष्ठ सनदी अधिकारी अनिल कवडे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. श्री. कवडे राज्याचे सहकार आयुक्त आहेत. आता त्यांच्याकडे दोन्ही महत्त्वाच्या पदांच्या जबाबदाऱ्या असतील. पूर्णवेळ साखर आयुक्तांची नियुक्ती होईपर्यंत कवडे यांच्याकडेच हा पदभार राहील.
दरम्यान, श्री. गायकवाड आणि साखर संचालक उत्तम इंदलकर यांना बुधवारी साखर आयुक्तालयाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी आयुक्तालयातील आणि संबंधित खात्यांतील सुमारे चारशे कर्मचारी उपस्थित होते. साखर आयुक्तालयातच हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी सहकार आयुक्त कवडे यांच्या हस्ते गायकवाड व इंदलकर यांचा सपत्निक हृद्य सत्कार करण्यात आला. संचालक संतोष पाटील प्रास्ताविकात दोघांच्या कार्याचा उत्तम आढावा घेतला.
यावेळी सेवानिवृत्त सनदी अधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी, साखर सहसंचालक मंगेश तिटकारे, सर्व खात्यांचे प्रमुख आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
चौथ्या मजल्यावरील सभागृह खचाखच भरले होते. साखर संकुलाच्या इतिहासात एखाद्या अधिकाऱ्याचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर निरोप समारंभ होण्याची ही पहिलीच वेळ होती.
यावेळी श्री. शेखर गायकवाड यांच्या ‘लीगल फ्रेमवर्क फॉर शुगर इंडस्ट्री’ आणि ‘साखर क्षेत्रातील सुधारणा’ या दोन पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले.