निलंगा तालुक्यात शॉर्टसर्किटने ऊस जळाला; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

लातूर : विदर्भ आणि मराठवाड्यात दिवसेंदिवस शॉर्टसर्किटने उभ्या ऊस पिकांना आगी लागल्याच्या घटनांमध्ये सतत वाढ होताना दिसत आहेत. निलंगा तालुक्यातील सावरी आणि बेलकंड येथील शेतातील उभा ऊस शॉर्टसर्किटने जळाल्याची घटना घडली. यात तीन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
पहिल्या घटनेत सावरी येथील शेतकरी अन्नपूर्णा मनोहर जाधव यांच्या शेतातील सर्वे नं. ८७ मध्ये वीजवितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे विद्युत तारांचे घर्षण होऊन उसाला भीषण आग लागली. या दुर्घटनेत एक हेक्टर क्षेत्रातील ऊस पूर्णपणे जळून खाक झाला आहे. मागच्या अनेक वर्षांपासून शेतामध्ये वीज प्रवाहाच्या तारा खाली झुकलेल्या अवस्थेत होत्या. महावितरण कर्मचाऱ्यांना वारंवार कल्पना देऊनही त्यांनी दखल घेतली नाही. एक हेक्टर मधील जवळपास ८० टक्के ऊस आगीत नष्ट झाला असल्याचे प्राथमिक पाहणीत निष्पन्न झाले आहे. तसेच ठिबक सिंचनचेही मोठे नुकसान झाले. स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दुसऱ्या घटनेत बेलकुंड (ता. औसा) येथील शेतकरी चंद्रकांत विठ्ठल मुकडे आणि पांडुरंग विठ्ठल मुकडे यांच्या ऊस शेतीत गुरुवारी दुपारी सुमारे दोन वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. शिवारातील बोअरवेलच्या केबल वायरमध्ये बिघाड होऊन झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. ही आग काही क्षणातच भडकली आणि वाऱ्याच्या वेगामुळे उसाच्या शेतात वेगाने पसरली. जवळपास अकरा महिन्यांचा वाढीच्या अवस्थेतील ऊस काही मिनिटांतच जळून खाक झाला. यंदा आधीच अतिवृष्टी, बदलते हवामान, महागडी लागवड आणि कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकरी संकटात सापडला असताना, आता वीज वितरणाच्या निष्काळजीपणामुळे उभे पीक नष्ट झाल्याने अन्नपूर्णा जाधव, चंद्रकांत विठ्ठल मुकडे आणि पांडुरंग विठ्ठल मुकडे यांच्या कुटुंबावर मोठा आर्थिक संकटाचा डोंगर कोसळला आहे.





