साखर कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी मागितली 1 कोटीची खंडणी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

तथाकथित कामगार नेत्याला 10 लाखांसह अटक

सोलापूर – माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) आमदार अभिजित पाटील यांच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी 1 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या तथाकथित कामगार नेत्याला गुरुवारी रात्री खंडणी स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. किरण राज घोडके असे खंडणी मागणाऱ्याचे नाव असून, त्याच्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती: गेल्या काही दिवसांपासून किरण राज घोडके हा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात आंदोलने करत होता. पुण्यातील साखर आयुक्तालयासमोर त्याने कारखान्याचे कामगार आणि काही व्यापाऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन केले होते. या आंदोलनाबाबत आमदार अभिजीत पाटील यांचे स्वीय सहाय्यक नितीन सरडे यांनी घोडकेकडे विचारणा केली.

त्यावेळी घोडकेने कारखान्याची बदनामी थांबवायची असेल तर 1 कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. यावर आमदार अभिजीत पाटील यांनी सरडे यांना पंढरपूर पोलिसांत तक्रार दाखल करण्यास सांगितले होते. त्यानुसार, सरडे यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात घोडकेविरोधात तक्रार नोंदवली.

गुरुवारी रात्री नितीन सरडे यांनी घोडकेला फोन करून एका मोठ्या हॉटेलमध्ये खंडणीची रक्कम घेण्यासाठी बोलावले. त्यापूर्वी, सरडे यांनी 10 लाख रुपयांच्या नोटा पोलीस आणि पंचांना दाखविल्या. पोलिसांनी दोन पंचांना सोबत घेऊन हॉटेल परिसरात सापळा रचला. रात्री साडेआठच्या सुमारास घोडके पैसे घेण्यासाठी आला असता, पोलिसांनी त्याला 10 लाख रुपयांच्या रकमेसह ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी आमदार अभिजीत पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची मोठ्या रकमेची ऑनलाइन फसवणूक झाली होती. याबाबत त्यांनी सध्या सुरू असलेल्या अधिवेशनातही मुद्दा मांडला होता. या घटनेनंतर आता कोणतीही चूक नसताना कारखान्याची बदनामी करत खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »