सुभाष शुगर्सविरुद्ध माजी साखर सहसंचालकाची गंभीर तक्रार
नांदेड : श्री सुभाष शुगर्स प्रा.लि.च्या मनमानी कारभाराचा विदारक अनुभव प्रादेशिक सहसंचालक (साखर) या पदावर राहिलेले साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक श्रीकांत देशमुख यांनाही आला असून त्यांनी या कारखान्याविरुध्द जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व संबंधितांकडे लेखी तक्रार केली आहे.
भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचा हडसणी (ता. हदगाव) येथील प्रकल्प चढ्या दराने विकत घेऊन तो सुभाष शुगर्स प्रा.लि. या नव्या नावानिशी चालविणाऱ्यांनी यंदाच्या गाळप हंगामात कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना अक्षरशः जेरीस आणले आहे.
वरील कारखान्याच्या कार्यक्षेत्रात हजारो टन ऊस शिल्लक असल्यामुळे अनेक शेतकरी हैराण झाले आहेत. कारखान्याने शिल्लक उसाची तोडणी तातडीने न केल्यास उसाच्या फडाला आग लावून शेतकरी आत्मदहनासारखे टोकाचे पाऊल उचलण्याच्या मनःस्थितीत असल्याची गंभीर बाब देशमुख यांनी आपल्या निवेदनात नमूद केली आहे.
या तक्रारीची आपण नोंद घेतल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी त्यांना कळविले आहे. हदगाव तालुक्यातील बनचिंचोली या गावचे जावई असलेल्या देशमुख यांची तेथे शेतजमीन आहे. त्यांच्या शेतातील काही क्षेत्रावरचा ऊस कारखान्याने नेला तर आणखी काही ऊस शिल्लक आहे.
याच गावातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस नेण्याच्या बाबतीत टोलवाटोलवी सुरू आहे.
उसतोडीसाठी असलेली कारखान्याची यंत्रणा प्रत्येक टप्प्यावर रकमेची मागणी करून शेतकऱ्यांची अडवणूक करत आहे. बऱ्याच ठिकाणचा ऊस पाण्याअभावी वाळत चालला आहे, असे नमूद करून जिल्हाधिकाऱ्यांना या प्रश्नामध्ये लक्ष घालण्याची विनंती त्यांनी केली आहे. वरील कारखान्यातील व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ येत्या ६ मार्च रोजी बनचिंचोली येथे अन्यायग्रस्त शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.
वरील तारखेपर्यंत कारखाना प्रशासनाने योग्य उपाययोजना न केल्यास शेतात उभ्या असलेल्या उसाला आग लावणे तसेच गरज पडल्यास आत्मदहन करणे अशा स्वरूपाचे आंदोलन असेल, असा इशारा त्यांनी दिला.