‘श्रीनाथ’ कारखान्याच्या वाढीव १२० KLPD डिस्टिलरी प्रकल्पाचे लोकार्पण
पुणे :- श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचा वाढीव १२० KLPD डिस्टिलरी प्रकल्पाचे उद्घाटन व ऊस गळीत हंगाम २०२३-२४ मधील उत्पादित साखर पोत्याचे पूजन कार्यक्रम शुक्रवार रोजी (दि. १०) रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रम प्रसंगी कारखान्याचे संचालक, श्री. किसन दिनकर शिंदे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. शुभांगी किसन शिंदे यांच्या हस्ते श्रीनाथ म्हस्कोबा महाराज यांचा अभिषेक करून डिस्टिलरी प्रकल्पाची पूजा करण्यात आली.
कारखान्याचा ऊस गळीत हंगाम २०२३-२४ हा नुकताच सुरु झाला असून कारखान्याच्या उत्पादित २७००१ साखर पोत्याचे पूजन डॉ. दिगंबर दुर्गाडे (अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि,) श्री. रमेशआप्पा थोरात (मा.आमदार, दौंड, व संचालक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि,) यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रसंगी कारखान्याच्या वाढीव १२० KLPD क्षमतेच्या डिस्टिलरी प्रकल्पाचे उद्घाटन डॉ. राजेंद्र हिरेमठ (अध्यक्ष, जनसेवा सहकारी बँक लि, पुणे) यांच्या हस्ते व या प्रकल्पास अर्थसहाय्य केलेल्या सर्व बँकांचे पदाधिकारी, व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. हा सर्व कार्यक्रम ह.भ.प सुमंतबापु यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या प्रसंगी जनसेवा सहकारी बँक लि, पुणे चे सीईओ, श्री.शिरीष पोळेकर, उप सरव्यवस्थापक, श्री.रविंद्र हिरवे, सह. सरव्यवस्थापक, श्री.निलेश कापरे, जिजामाता महिला सहकारी बँक लि, च्या अध्यक्षा, सौ. रत्नमाला म्हस्के, जनता सहकारी बँक लि, पुणे, च्या उपाध्यक्षा सौ.अलका पेठकर, सीईओ, श्री.जगदीश कश्यप, संपदा सहकारी बँक लि, चे अध्यक्ष, श्री.अश्विनीकुमार उपाध्ये, संचालक, श्री. जितेंद्र पैठणकर , शाखा व्यवस्थापक, श्री. नितीन वणे, जळगांव जनता सहकारी बँक लि, चे शाखा व्यवस्थापक, श्री. दिनेश मडके, यवतमाळ अर्बन को-ऑप. लि, चे शाखा व्यवस्थापक,सौ. मानसी मोडक, कृषीनाथ ग्रीन अग्रो लि, पारनेर या कारखान्याचे अध्यक्ष, श्री.महेश करपे, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे संचालक, श्री.अनिल भुजबळ, श्री.अनिल बधे, श्री.माधव राऊत, श्री.हनुमंत शिवले महाराज, श्री.दशरथ मेमाणे, श्री.रविंद्र शेठ भुजबळ, डॉ. श्रीकांत कदम, श्री. आबासाहेब करंजे, कारखान्याचे मार्गदर्शक, श्री. लक्ष्मण कदम, श्री. चंद्रकांत कदम तसेच प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
स्वागतपर भाषणात कारखान्याचे कार्याध्यक्ष, श्री.विकास (अण्णा) रासकर म्हणाले, साखर कारखान्यातून कोजनरेशन, इथेनॉल, सी.एन.जी आणि भविष्यात ग्रीन हायड्रोजन हे ४ महत्वाचे ऊर्जास्त्रोत निर्माण करणारा साखर उद्योग आहे. भविष्यात त्याची सर्व जगाला गरज असणार आहे. यामुळे पर्यावरण संरक्षण होणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. डी. एम. रासकर यांनी प्रास्ताविकात, स्थापनेपासून ते आतापर्यंतच्या कारखान्याच्या प्रगतीची माहिती दिली. यामध्ये कारखाना स्थापन करतेवेळी जुनी मशिनरी आणून कारखाना सुरु केला. जसे-जसे कारखाना वाढत केला तसे-तसे नवीन मशिनरी वाढवत जाऊन कारखान्याची क्षमता वाढविण्यात येऊन कारखाना कमी जागेत बसविण्यात आला आहे. त्याच जागेत १२५० मे. टन ते ५०००, मे. टन प्रति दिन क्षमतेने कारखाना चालू आहे. अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आलेले आहेत. त्यामध्ये ३ KLPD, आर अँड डी प्लांट, सिओटू प्लांट, यशस्वी बीट लागवड, गोड ज्वारी लागवड केली आहे. त्यापासून भविष्यात गाळप करून साखर तयार करण्याचे नियोजन आहे, गंधक विरहीत साखर उत्पादन करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. कारखाना कमीत कमी कर्मचाऱ्यामध्ये चालविण्यात येत असून, यामध्ये कर्मचारी समाधानी आहेत. यासाठी चेअरमन मा. राऊत सर्वांची काळजी घेतात. कारखान्याशी निगडित सर्व शेतकरी, कर्मचारी, ऊसतोडणी वाहतूकदार, ठेकेदार, या सर्वांशी कारखान्याचे कौटुंबिक नाते असून श्रीनाथ हा एक परिवार आहे. मा. राऊत यांच्या दूरदृष्टीमुळे कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे.
कारखान्याचे अध्यक्ष श्री. पांडुरंग राऊत म्हणाले की, कारखान्याची क्षमता टप्प्याटप्प्याने वाढत नेली. त्याच बरोबर विविध बायप्रोडक्ट निर्मिती करण्यात येत आहे. काळाची पावले ओळखून नवीन वाढीव १२० KLPD क्षमतेच्या डिस्टिलरी प्रकल्पाची उभारणी केली आहे. त्याचे आज उद्घाटन झालेले आहे. यामुळे इथेनॉल उत्पादन क्षमता २०० KLPD होणार आहे. चालू हंगाम हा अत्यंत आव्हानात्मक आहे. कारखाना कार्यक्षेत्रात उसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे हंगाम लवकर संपणार आहे. त्यामुळे उत्पादन खर्च वाढणार आहे. असे असले तरी कारखान्याने आर्थिक नियोजन करून विविध बँकाची कर्ज हफ्ते व व्याज देणी वेळेत चुकती केलेली आहेत. त्यामुळे कारखान्याला कसलीही आर्थिक अडचण येणार नाही असे वाटते.
श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना हा अत्यंत काटकसरीने चालविण्यात येत आहे. नियमित कर्ज हफ्ते व व्याज वेळेत भरणा करीत असल्यामुळे बँका नेहमीच कारखान्याच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या आहेत. त्यामुळेच कारखान्याची प्रगती होऊन शकली आहे. तसेच कारखान्याने शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगल्या दराबरोबरच गुंतवणूकदार सभासदांना १८% लाभांश दिलेला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. चालू वर्षीही शेतकऱ्यांच्या ऊसाला कारखाना चांगला बाजारभाव देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे ते म्हणाले.
श्री. रमेश (आप्पा) थोरात म्हणाले की, आतापर्यंत श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याचे आणि माझे जिव्हाळ्याचे संबंध राहिलेले आहेत. कारखाना नेहमीच सातत्याने प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. याचे सर्व श्रेय कारखान्याचे अध्यक्ष श्री. राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जात आहे. या कारणामुळेचे पी.डी.सी.सी. बँकेने कारखान्यास मोठ्या प्रमाणात कर्ज देऊ केलेले आहे. आतापर्यंत कारखान्याकडून वेळेत कर्ज हफ्ते व व्याजे भरण्यात आलेले आहेत. कारखान्यात आर्थिक शिस्त चांगल्या प्रकारे पाळली जाते.
श्री. हिरेमठ म्हणाले की, कारखान्याचे आणि बँकेचे चांगले जिव्हाळ्याचे संबंध आहेत. कारखान्याने वेळेत कर्ज हफ्ते व व्याज भरून विश्वास संपादन केलेला आहे. मा. राऊत यांनी इतर उद्योगांनासुद्धा यशस्वीपणे उद्योग कसा चालवावा याबाबत मार्गदर्शन करावे.
अध्यक्षीय भाषणात, डॉ. दुर्गाडे म्हणाले की, सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. या युगामध्ये ज्या संस्था अगर कारखाने धोके स्वीकारतील तेच भविष्यात प्रगती करतील. जगातील प्रमुख ऊस उत्पादनात ब्राझील हा देश पहिला असून भारत हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील जवळ पास २१% जमीन ही ऊस उत्पादित क्षेत्र आहे. भारतामध्ये महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकाचा ऊस उत्पादक राज्य असून बऱ्याच कारखान्यात साखरेबरोबरच इतर उपपदार्थ यांची निर्मिती केली जात आहे. श्रीनाथ म्हस्कोबा हा त्यातील एक कारखाना आहे. त्यामुळेच त्याची प्रगतीपथावर वाटचाल सुरु आहे. याचे सर्व श्रेय कारखान्याचे अध्यक्ष व त्यांच्या सहकाऱ्यांना आहे.
उपाध्यक्ष श्री. योगेश ससाणे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त करून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.