मजुरांना गरजेच्या वस्तू मोफत देणारी *माणुसकीची भिंत!*

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पाटेठाण श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या वतीने अनेक वर्षांपासून सुरू असलेला माणुसकीची भिंत हा अभिनव उपक्रम राबवला जात आहे. सध्या कडक्याच्या पडलेल्या थंडीत ऊस तोडणी वाहतूक करणार्या मजुरांसाठी निश्चितच उबदार ठरत आहे. परिसरातील शेतकरी व ऊस तोडणी मजूर यांचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष श्री. पांडुरंग राऊत यांच्या संकल्पनेतून कारखाना कार्यस्थळावर बांधकाम स्वरुपात एक आकर्षक भिंत तयार करण्यात आलेली आहे. भिंतीवर रंगभरण करून विविध वस्तू, कपडे ठेवण्यासाठी मांडणी करण्यात आली आहे. या भिंतीला माणुसकीची भिंत असे नाव देण्यात आलेले आहे.

याठिकाणी परिसरातील नागरिक त्यांच्याकडे अतिरिक्त असलेल्या किंवा नको असलेल्या चांगल्या स्थितीतील कपडे, स्वेटर्स, चादर इ. वस्तू ठेवून जातात. ज्यांना आवश्यकता आहे असे तोडणी वाहतूक मजूर, शेतमजूर, शेतकरी येथून वस्तू वा कपडे घेऊन जातात व त्यांचा स्वत:साठी आणि कुटुंबासाठी वापर करतात करतात.

या सामाजिक उपक्रमाच्या अशा केवळ्या पॅटर्नमुळे देणारा कोण आहे व घेऊन जाणारा कोण आहे हे एकमेकांना माहिती नसते. त्यामुळे घेऊन जाणाराला संकोच वाटत नाही व ठेवून जाणाराला अहंकार राहत नाही. यानिमित्ताने गरजू लोकांना मदत होत आहे. ऐन थंडीमध्ये गरजूंना मायेची ऊब मिळली आहे.

Wall of Humanity- a novel social activity by Shrinath Sugar
उत्तम कपडे मिळाल्यानंतर आनंदलेले मंजुरांचे चेहरे. सोबत कारखान्याचे अधिकारी

गळीत हंगाम चालू असताना दोन ते अडीच हजार मजूर कारखाना स्थळावर स्थायिक असतात. त्यामुळे कारखाना परीसर गजबजलेला असतो. तसेच परिसरातील शेतकरी बांधव कारखाना कामासाठी येत असतात. सामाजिक हित जोपासण्यासाठी माणुसकीच्या भिंतीच्या माध्यमातून कारखाना सामाजिक बांधिलकी जपत आहे. समाजातील गरजू व्यक्तींना अप्रत्यक्षपणे मदत करीत आहे. या उपक्रमाचे परिसरातील नागरिक कौतुक करीत आहेत. माणुसकीची भिंत ही एका कल्पवृक्षाप्रमाणे आहे. आपल्याला आवश्यक असलेली वस्तू किंवा कपडे तेथे अनपेक्षितपणे मिळत असतात.

D M Raskar

यासंदर्भात कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. रासकर सांगितले, की आमच्या कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांना नेहमी वेगळ्या कल्पना सुचत असतात. त्यांच्याच संकल्पनेतून माणुसकीची भिंत अवतरली आहे. माणूस जेव्हा स्वत: गरजूला प्रत्यक्ष भेटून दान करतो तेव्हा त्याच्या मनात उपकाराची भावना येऊ शकते. तसेच घेणार्‍या गरजूला संकोचल्या सारखे होते. त्यावर उपाय म्हणजे ही माणुसकीची भिंत. विशेष म्हणजे केवळ गरजू लोकच तेथील साहित्य घेऊन जातात. त्या वस्तूंचा कधीच अपव्यय होत नाही. भविष्यात या संकल्पनेला आणखी व्यापक स्वरूप कसे देता येईल यावर नक्की विचार करू.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »