सूर्यप्रकाशातून स्वयंपाक: “सोलर-हायड्रोजन स्टोव्ह” शक्य आहे का?

–दिलीप पाटील

भारतातील IIT Bombay ने स्वयंपाकाच्या क्षेत्रात एक अभिनव पाऊल टाकले आहे. IIT Bombay च्या SoULS (Solar Urja through Localisation for Sustainability) उपक्रमाने Solar PV Cook-stove म्हणजेच सौर चूल विकसित केली आहे. हा DC-इंडक्शन-आधारित स्टोव्ह सौरऊर्जेवर चालतो आणि दिवसा किंवा रात्री कधीही वापरता येतो.
याच पार्श्वभूमीवर एक अधिक महत्त्वाकांक्षी प्रश्न उपस्थित होतो: PM Surya Ghar Muft Bijli Yojana अंतर्गत ज्या लाखो घरांवर सोलर पॅनेल्स बसवली गेली आहेत, त्यांनी या सौरऊर्जेचा उपयोग हायड्रोजन निर्मितीसाठी आणि त्याद्वारे एलपीजीला पर्याय म्हणून स्वयंपाकासाठी करता येईल का?

भारतामध्ये अजूनही सुमारे ४५ कोटी लोक स्वच्छ स्वयंपाक इंधनापासून वंचित आहेत. अनेक ग्रामीण कुटुंबे लाकूड, शेणकांड्या किंवा पीक अवशेष वापरून स्वयंपाक करतात. यामुळे घरात मोठ्या प्रमाणात धूर तयार होतो ज्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो विशेषतः महिला व लहान मुलांवर. याच वेळी, PM Surya Ghar योजनेअंतर्गत देशभरात लाखो सोलर रूफटॉप प्रणाली बसवण्यातआल्या आहेत.
हायड्रोजनचा स्वयंपाकासाठी प्रत्यक्ष प्रयोग कुठे झाला आहे का?
हायड्रोजन स्वयंपाकाची संकल्पना केवळ सैद्धांतिक नाही. NTPC च्या R&D विभाग NETRA ने ग्रेटर नोएडा येथे हायड्रोजन कुकिंगचे यशस्वी प्रात्यक्षिक केले आहेत. IIT Bombay चे Prof. Prakash C. Ghosh यांनी सिक्कीम येथे ७,००० मीटर उंचीवर लष्करी तळासाठी सोलर मायक्रोग्रीड आणि हायड्रोजन फ्यूएल सेल प्रणाली यशस्वीरित्या बसवली , ज्यामुळे सोलर-हायड्रोजन एकत्रीकरणाची तांत्रिक व्यवहार्यता सिद्ध झाली आहे.
हे तंत्रज्ञान कसे कार्य करेल?
घराच्या छतावरील सोलर पॅनेल्सपासून वीज निर्माण होईल. ही वीज इलेक्ट्रोलायझरसाठी वापरली जाईल, ज्याद्वारे पाण्याचे हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये विभाजन होईल. हायड्रोजन एका बफर टाकीत साठवला जाईल आणि विशेष डिझाइन केलेल्या बर्नरमध्ये वापरला जाईल. हा हायड्रोजन जळताना फक्त पाण्याची वाफ तयार होते ना कार्बन डायऑक्साइड, ना विषारी वायू.
“थेट वापर” खरेच शक्य आहे का?
सूर्यप्रकाश आणि स्वयंपाकाची वेळ जुळत नाही स्वयंपाक सकाळी आणि संध्याकाळी होतो, उत्पादन मात्र दुपारी जास्त. त्यामुळे कमीत कमी एक छोटी बफर टाकी किंवा बॅटरी बफर आवश्यक ठरते. त्यामुळे पूर्णतः “थेट” वापर व्यावहारिकदृष्ट्या अशक्य आहे.
खरी आव्हाने काय आहेत?
हायड्रोजन हे एलपीजीपेक्षा जास्त ज्वलनशील आहे आणि त्याची ज्वलन मर्यादा हवेत ४% ते ७५% इतकी आहे. दिवसाच्या प्रकाशात हायड्रोजनची ज्योत जवळजवळ अदृश्य असते. त्यामुळे घरगुती वापरात सुरक्षा यंत्रणा, लीक सेन्सर, आणि योग्य वेंटिलेशन याबाबी अनिवार्य आहे. सध्या इलेक्ट्रोलायझरची किंमत ₹५०,०००-१,५०,००० इतकी असल्याचे समजते त्यामुळे वैयक्तिक घरगुती प्रणाली सध्यातरी किफायतशीर नाही असे वाटते.
हायड्रोजनचा स्वयंपाकासाठी गाव-पातळीवरील सामाईक वापर वास्तवादी मार्ग आहे.
सर्वात व्यवहार्य मॉडेल म्हणजे वैयक्तिक घरांऐवजी २०-५० घरांसाठी एक केंद्रीय सोलर-इलेक्ट्रोलायझर युनिट जिथून लहान पाइपलाईनद्वारे हायड्रोजन पुरवठा होईल. यामुळे साठवण आणि सुरक्षेचे प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटतात. IIT Bombay च्या सौर चुल प्रकल्पाचा बेतूल जिल्ह्यातील अनुभव सांगतो की ग्रामीण समुदाय-आधारित पायलट हा यशाचा खरा मार्ग आहे हाच धडा हायड्रोजन कुकिंगलाही लागू होतो.
“सोलर ते स्वयंपाक” हा प्रवास मग तो इंडक्शनद्वारे असो वा हायड्रोजनद्वारे भारतासाठी एक दिशादर्शक वाटचाल आहे. PM Surya Ghar योजनेने देशभरात सोलर पायाभूत सुविधा निर्माण केली आहे. आता गरज आहे ती योग्य तंत्रज्ञान निवडीची, सुरक्षित अंमलबजावणीची आणि समुदाय-आधारित पायलट प्रकल्पांची विशेषतः महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमधील ग्रामीण भागात. भविष्यात, जेव्हा ग्रीन हायड्रोजनची किंमत ₹300 प्रति किलोपेक्षा कमी येईल, तेव्हा हीच संकल्पना खऱ्या अर्थाने क्रांतिकारी ठरेल.
(लेखक दिलीप पाटील हे आयएफजीई शुगर बायोएनर्जी फोरमचे सहअध्यक्ष आहेत.)






