‘सौरऊर्जेमुळे को-जन, इथेनॉल प्रकल्प अडचणीत’

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर : आधुनिकीकरणामुळे सौरऊर्जेचा वापर वाढल्यामुळे सौरऊर्जा आणि विजेवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन पाहता, कष्टाने उभे केलेले सहवीज व इथेनॉल प्रकल्प आगामी दहा वर्षांत भंगार होतील की काय, अशी भीती वाटत असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री व कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रथयात्रा नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते.

साखर कारखान्यांची श्वेतपत्रिका काढणार

कोणत्याही कारखान्याचा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने पार पडला नाही. दुसरीकडे मात्र उसाची ‘एफआरपी’ वाढत आहे. साखर उद्योगच अडचणीत आला आहे.  साखर दरातील वाढीमुळे सांपत्तिक स्थिती ढासळली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडील सर्व साखर कारखान्यांची श्वेतपत्रिका महिनाभरात काढणार असल्याची घोषणाही यावेळी मंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी केली.

…तर एआय’चा वापर करावा लागेल

मंत्री मुश्रीफ म्हणाले, यंदा साखर कारखाने तीन महिने चालले असून, हे विदारक चित्र बदलण्यासाठी ‘एआय’चा वापर करावा लागेल. कारखान्यांनी या नवतंत्रज्ञानासाठी पुढाकार घ्यावा. त्याला कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक मदत करेल. उसाचे एकरी उत्पादन वाढल्याशिवाय आगामी काळामध्ये साखर उद्योग चालणार नाही. यामध्ये ‘एआय’ तंत्रज्ञान आशेचा अंधुक किरण दिसत आहे.

राज्यातील एकही योजना बंद होणार नाही

दरम्यान, महायुतीने सुरू केलेल्या योजनांबाबत विरोधक अफवा पसरवत असून, राज्यातील एकही योजना बंद होणार नाही. राज्याची आर्थिक घडी सक्षम करत असताना विकासकामांना पैसे कमी न पडता योजना सुरू ठेवल्या जातील. तसेच लाडक्या बहिणींनाही योग्य वेळी २१०० रुपये दिले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »