‘सोमेश्वर’च्या सभासदांसाठीचा ‘एआय’ मेळावा उत्साहात

सोमेश्वरनगर : शेतकऱ्यांनी ‘एआय’च्या माध्यमातून उसाचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करावा. या हेतूने शेतकऱ्यांमध्ये ‘एआय’संदर्भात जनजागृती व्हावी, यासाठी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने बारामती येथील कोऱ्हाळे बुद्रक येथे ‘एआय’ मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. हा मेळावा डॉ. यशवंत भगत यांच्या प्रक्षेत्रावर नुकताच पार पडला. यावेळी सभासद शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. मेळाव्यात ‘एआय तंत्रज्ञानाचा ऊस पिकासाठी वापर’ या विषयावर शेतकऱ्यांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
या वेळी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, ज्येष्ठ संचालक राजवर्धन शिंदे, माजी सभापती प्रमोद काकडे, विक्रम भोसले, संचालक सुनील भगत, लक्ष्मण गोफणे, सिद्धार्थ गीते, आनंदकुमार होळकर, शेती अधिकारी बापूराव गायकवाड, विराज निंबाळकर, शेतकरी व सभासद उपस्थित होते.
मेळाव्यादरम्यान आदित्य विलास भगत यांनी ऊस पिकास एआय तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पाण्याची बचत, कीड व रोग नियंत्रण व खत व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. तर कृषी विज्ञान केंद्राच्या तुषार जाधव यांनी ऊस शेतीसाठी एआय तंत्रज्ञानासाठी येणार खर्च व या तंत्रज्ञानाचे कामकाज या विषयी माहिती दिली.
शेतकऱ्याला एआय आधारित साहाय्य मिळणार : जगताप
बारामती येथील अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापरून उसाची उत्पादनक्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. या तंत्रासाठी प्रत्येक शेतकऱ्याला एआय आधारित साहाय्य दिले जाईल. प्रत्येक शेतकऱ्याला एक एकर ते अडीच एकरापर्यंत खर्च रक्कम मिळणार आहे. याशिवाय सॅटेलाइट व क्लाऊड सेवा, आर्द्रता सेंसर्स, हवामान केंद्र, माती परीक्षण किट, एआय सोलुशन यासाठीही काही रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. एआय तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार आहे. सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्र यांनी दिलेली लिंक वापरून आपले रजिस्ट्रेशन करावे. एआय तंत्रज्ञान वापराकरिता लागण हंगाम २०२५-२०२६ मध्ये पन्नास हजार शेतकऱ्यांचे मिळून एक लाख एकर क्षेत्रासाठी एआय तंत्रज्ञान करावयाचे असून, जे शेतकरी लवकरात लवकर नोंदणी करतील त्यांनाच त्याचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती या वेळी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.