‘हात धुऊन’ घेणारा ‘लीडर’
भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त अधिकारी शेखर गायकवाड (आयएएस) म्हणजे उत्तम प्रशासक, उत्तम संवादक, उत्तम निर्णय क्षमता, उत्तम निरीक्षण शक्ती, उत्तम लेखक, उत्तम विनोदबुद्धी इ. अनेक गुणांचा मिलाफ… त्यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय कारकीर्दीत अनेक लोकाभिमुख कामे करताना, त्यांना काही गमतीशीर अनुभवदेखील आले. ते त्यांनी शब्दबद्ध केले आहेत, ते विनोदी शैलीत असले, तरी सामाजिक वास्तव मांडणारे आहेत… त्यावर आधारित सदर ‘प्रशासकीय रंगढंग’ खास ‘शुगरटुडे’ मॅगेझीनच्या वाचकांसाठी…. भाग ४
एका वस्तीवर शंकरभाऊ नावाच्या स्थानिक पुढाऱ्याच्या शेताच्या आजूबाजूला अनेक छोट्या शेतकऱ्यांच्या जमिनी होत्या. शंकरभाऊ हा गावात अनेक खटपटी करून पुढारपण करत असे. पहिल्यांदा तो ग्रामपंचायतीचा सदस्य झाला. सहा- सात वर्षांतच अनेक प्रश्न उपस्थित करत त्याने गावच्या प्रस्थापित पुढाऱ्यांना सुद्धा त्रास द्यायला सुरुवात केली आणि आपोआप तो शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविणारा लीडर बनला.
गावातल्या इतर वाड्यातल्या लोकांना तो त्रास देत असला, तरी अजून तरी स्वतःच्या वस्तीवर तो अधिक शहाजोगपणे वागत होता. आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्याचा फारसा त्रास नव्हता. काही वर्षे उलटली आणि तो त्याच्या शेतात जायला तीन शेतकऱ्यांच्या शेतातून जास्त रुंदीचा रस्ता मागू लागला. पूर्वी त्याच्या शेतात जायला केवळ पायवाट होती. पायवाटेनेच आपली शेती तो वाहत होता. त्यात त्याला कधी कुठलीही अडचण भासली नाही. आता मात्र त्याची अपेक्षा वाढली होती.
माझा ट्रॅक्टर माझ्या शेतापर्यंत गेला पाहिजे आणि उसाचा ट्रक सुद्धा थेट माझ्या जमिनीच्या वाटणीपर्यंत पोहोचला पाहिजे, अशी त्याची इच्छा होती. आजूबाजूच्या शेतकऱ्यांना दोन-तीन वेळा त्याने त्याची ही अपेक्षा बोलून दाखवली. त्या शेतकऱ्यांनी त्याला सांगितले, की सगळ्या शेतकऱ्यांना जमीन कमी आहे. त्यातच त्यांचा उदरनिर्वाह भागत नाही. अशा शेतकऱ्यांची जमीन रस्त्यात गेली तर त्यांचे जगणेच कठीण होईल.
आधीच नैसर्गिक आपत्ती वाढल्या आहेत. त्यातून शेतपिकांचे नुकसान होऊन उत्पादन घटत चालले आहे. शेती दिवसेंदिवस कठीण आणि जोखीमयुक्त ठरत आहे. पिढ्यान् पिढ्या या पाऊलवाटेनेच तू तुझ्या शेतात जात आला आहेस. केवळ कारखान्याला ऊस घालताना शंभर फूट रस्त्यापर्यंत तुला ऊस घेऊन जावा लागतो. तेवढ्यासाठी आजूबाजूच्या भावकीतल्या लोकांचे नुकसान करून तू दहा फूट रुंदीचा रस्ता काही मागू नको, असे त्याला ज्येष्ठ मंडळींनी सांगितले.
परंतु शंकरभाऊच्या मनात दुसरा डाव शिजत होता. एक दिवस शेजारच्या गावाला जाणारा वीस फूट रुंदीचा रस्ता डांबरीकरणासह त्याने आमदारांकडून मंजूर करून आणला आणि त्याचा उद्घाटन समारंभसुद्धा त्याने घडवून आणला. दोन गावांची सोय होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर दोन्ही गावचे शेतकरी या नव्या रस्त्याच्या भूमिपूजनाला हजर होते. या नव्या रस्त्याची रचना अशी करण्यात आली होती, की ज्यावरून शंकरभाऊच्या जमिनीपर्यंत आपोआपच वीस फुटाचा रस्ता होणार होता.
परंतु हा रस्ता केवळ शंकरभाऊसाठी नव्हता तर दोन गावे जोडणारा होता. विशेष म्हणजे कायद्यानुसार शेतात जाण्यासाठी जर शंकरभाऊने रस्ता मागितला असता, तर त्याला तीन मीटर रुंदीचा गाडी रस्ता जास्तीत जास्त मिळाला असता. एवढेच नाही तर असा रस्ता देताना गाडी रस्त्यातला निम्मा भाग त्याच्या जमिनीतून व निम्मा रस्ता दुसऱ्याच्या शेतातून अशा पद्धतीने त्याला हा रस्ता मंजूर झाला असता.
थोडक्यात काय, तर स्थानिक पुढारी म्हणून काम करत असतानाच आता शंकरभाऊ हा त्याचे कार्यक्षेत्र मोठे करत अनेक गावांचा लीडर होत होता. हे करतानाच आजूबाजूच्या लोकांचे अप्रत्यक्षरीत्या नुकसानच त्यांनी केले होते. विशेष म्हणजे एरवी कोणत्याही शेतकऱ्यांनी दुसऱ्याच्या जमिनीतून जर रस्ता मागितला असता तर शेजारच्या शेतकऱ्याने त्याला तू सरळ माझ्याकडून जमीन विकत का घेत नाही, अशी विचारणा केली असती.
या प्रकरणात मात्र आता सरकारी खर्चाने पूर्ण रस्ता होणार होता. शेतकऱ्यांना सुद्धा सरकारी तिजोरीतून पैसे मिळणार होते. सोय मात्र शंकरभाऊचीच होणार होती. स्थानिक पुढारी परंतु मूळचा शेतकरी असणाऱ्या अनेक लोकांच्या बाबतीत ही गोष्ट आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सतत जाणवत राहते, त्याची ही सहज लक्षात न येणारी हुशारीची गोष्ट.