पुणे विद्यापीठात २९ ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय साखर उद्योग परिषद

आवडल्यास ही बातमी शेअर करा

‘अर्थकारण आणि साखर उद्योगाच्या उत्कर्षाची दिशा’ यावर होणार मंथन!

पुणे: महाराष्ट्रातील साखर उद्योगासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणारी ‘राज्यस्तरीय साखर उद्योग परिषद’ शुक्रवार, दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात आली आहे.

पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकार अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आणि महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे . या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट “साखर उद्योगाच्या उत्कर्षासाठी अर्थकारणाची दिशा” यावर सखोल चर्चा करणे हे आहे.

परिषदेचे स्वरूप आणि उद्दिष्टे: सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत होणाऱ्या या एकदिवसीय परिषदेमध्ये साखर उद्योगाच्या अर्थकारणासंदर्भात अनेक नामवंत विचारवंत उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. जागतिक अर्थव्यवस्थेत होत असलेले जलद बदल आणि अस्थिरता लक्षात घेता, साखर उद्योगाच्या भविष्यासाठी अर्थकारणाचा विचारविनिमय होणे अत्यंत आवश्यक आहे. या परिषदेचा उद्देश उद्योगाला एक नवी दिशा देणे आणि सर्व संबंधितांनी विचारविनिमय करून एक कृती आराखडा (रोड मॅप) तयार करणे आहे.

सहभागाची अपेक्षा आणि प्रमुख सहभागी: या परिषदेत सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांचे पदाधिकारी, संचालक, कार्यकारी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होतील. तसेच, विद्यापीठातील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी आणि साखर उद्योगाशी संबंधित विचारवंतही उपस्थित राहणार आहेत. या माध्यमातून विद्यापीठ आणि साखर उद्योग यांच्यात समन्वय साधला जाईल, ज्यामुळे साखर उद्योगासंबंधी सखोल संशोधन शक्य होईल अशी अपेक्षा आहे.

परिषदेचे महत्त्वाचे फलित: या परिषदेतून निघणारे निष्कर्ष आणि फलित लिखित स्वरूपात भारताचे सहकार मंत्री अमित शाह यांना सादर केले जाणार आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी १९४९ पासून सुरू केलेल्या सहकारी साखर कारखान्यांच्या चळवळीने केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम केले आहे. भारतीय साखर उद्योग अनेक संकटांना तोंड देत असताना, ही परिषद भविष्यातील दिशा ठरवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सहभागाचे नियम आणि शुल्क:

महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांना त्यांच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसह परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक कारखान्याला जास्तीत जास्त तीन प्रतिनिधींसाठी परिषदेमध्ये प्रवेश दिला जाईल. प्रति कारखाना (तीन प्रतिनिधींसाठी) नाममात्र प्रवेश शुल्क रु. २०००/- निश्चित करण्यात आले आहे. हे शुल्क RTGS/NEFT द्वारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बँक खात्यात (खाते क्रमांक: 20063000281, IFSC कोड: MAHB0001335) भरता येईल किंवा परिषद स्थळी रोख रकमेनेही स्वीकारले जाईल.

आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी २५ ऑगस्ट २०२५ पूर्वी प्रवेश शुल्क भरणे आवश्यक आहे. सहभाग नोंदणीसाठी पुढील  लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

https://forms.gle/gyfRsNRFFjwAnPUR6

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला ७६ वर्षांची गौरवशाली परंपरा असून, सहकार क्षेत्राशी त्याचे जुने नाते आहे. न.चि. केळकर आणि धनंजयराव गाडगीळ यांसारख्या दिगग्ज विचारवंतांनी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम केले आहे . विद्यापीठाने सहकारी साखर निर्मितीच्या चळवळीचा पाया घालणारे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नावाने अध्यासन स्थापित केले आहे, आणि त्यांच्या जयंतीनिमित्तच या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे .

आवडल्यास ही बातमी शेअर करा
Select Language »