संघर्षातून यश : ऊसतोड कामगाराची लेक आरती पोलीस दलात”

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कंधार: जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करता येते, हे सोनमाळतांडा (ता. कंधार) येथील आरती जाधव हिने सिद्ध करून दाखवले आहे. एका ऊसतोड कामगाराच्या मुलीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नांदेड पोलीस दलात मजल मारली असून, तिने आपल्या आई-वडिलांचे कष्टाचे स्वप्न साकार केले आहे. आरती जाधवची ही यशोगाथा आज ग्रामीण भागातील हजारो तरुण-तरुणींसाठी प्रेरणेचा स्रोत ठरत आहे.


पोटाला चिमटा घेऊन दिले शिक्षण
आरतीचे वडील कांतीलाल रामराव जाधव हे ऊसतोड मजूर आहेत. आर्थिक ओढाताण पाचवीला पुजलेली असतानाही, आपल्या मुलीने शिकून स्वत:च्या पायावर उभे राहावे, ही त्यांची जिद्द होती. पदोपदी गरिबीचे चटके सोसून त्यांनी आरतीच्या शिक्षणासाठी आणि पोलीस भरतीच्या तयारीसाठी रक्ताचे पाणी केले.


अथक परिश्रम आणि यश
आपल्या कुटुंबाची परिस्थिती बदलण्याच्या इराद्याने आरतीने मैदानात उतरून सराव सुरू केला. दररोज पहाटे उठून धावणे, गोळाफेक, लांब उडी यांसारख्या शारीरिक चाचण्यांचा सराव आणि सोबतच अभ्यासाचे सातत्य राखले. तिच्या या चिकाटीमुळेच तिची नांदेड पोलीस दलात निवड झाली आहे.


गावात जल्लोषाचे वातावरण
आरतीच्या या यशाने संपूर्ण सोनमाळ तांड्यावर आनंदाचे भरते आले आहे. तिच्या या यशाबद्दल बंजारा क्रांती दलाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संजय पवार, माजी पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण यांसह अनेक मान्यवरांनी तिचे कौतुक व सत्कार केला आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »