गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याची साखर उद्योगात क्षमता

आवडल्यास ही बातमी शेअर करा

विशेष आर्थिक लेख
(शुगरटुडे )

2023 या वर्षाचे सहा महिने उलटून गेले आहेत आणि पुढील तीन महिन्यात म्हणजे ऑक्टोबर पासून उसाचा गळीत हंगाम आणि साखरेचे उत्पादन सुरू होण्यास प्रारंभ होईल. त्या दृष्टिकोनातून साखर कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी किंवा कसे याचा आढावा घेतला तर सध्या तरी या उद्योगाला चांगले दिवस आलेले दिसतात. गुंतवणूकीच्या दृष्टीने घेतलेला या उद्योगाचा वेध.

  • प्रा. नंदकुमार काकिर्डे

भारतातील साखर उद्योग हा कृषी उत्पादनावर आधारित देशातील पहिल्या क्रमांकाचा उद्योग अलीकडे बनला आहे. पूर्वी कृषी क्षेत्रावर आधारित असलेला वस्त्रोद्योग हा आघाडीवर होता. मात्र त्याची जागा आता साखर उद्योगाने घेतल्याचे त्यातील आकडेवारी करून स्पष्ट होते.

देशातील साखर उद्योगाचा आढावा घ्यायचा झाला तर सहकार क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र यामध्ये साखर उद्योगाची विभागणी करता येते. सध्या खाजगी व पब्लिक लिमिटेड कंपन्या 350 च्या घरात आहेत तर सहकार क्षेत्रात 210 पेका जास्त असे एकूण 750 साखर कारखाने आहेत. त्यांची एकूण साखर उत्पादन क्षमता प्रतिवर्षी 350 लाख मेट्रिक टन इतकी आहे. देशातील एकूण साखर 80 टक्के उसापासून आणि साधारणपणे 20 टक्के बीट पासून तयार केली जाते. पाणी आणि मोसमी पावसावर अवलंबून असणारा हा साखर उद्योग आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यात प्रामुख्याने तर गुजरात, बिहार, आंध्र प्रदेश , हरियाणा, पंजाब व तामिळनाडू या राज्यात साखर उत्पादन केले जाते.

एका बाजूला देशातील सहकारी साखर कारखाने हा साखर उद्योगाचा मोठा आधारस्तंभ बनलेला असला तरी सुद्धा गेल्या काही दशकांमध्ये खाजगी क्षेत्रातील साखर कारखान्यांची संख्या सहकारी साखर कारखान्यांच्या तुलनेत वाढताना दिसत आहे. या खाजगी साखर कारखान्यांमध्ये पब्लिक लिमिटेड कंपन्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. त्यामुळे या कंपन्यांचे भाग भांडवल म्हणजे शेअर्स सर्वसामान्य गुंतवणूकदारांना खरेदी विक्रीसाठी देशातील दोन्ही प्रमुख शेअर बाजारांवर म्हणजे मुंबई शेअर बाजार व राष्ट्रीय शेअर बाजारावर सतत उपलब्ध असतात. गुंतवणूकदार म्हणून साखर उद्योगाचे शेअर्स हे गेल्या वर्षात चांगले लाभदायक ठरलेले होते. त्या पार्श्वभूमीवर 2023 या वर्षाचा अंदाज घ्यायचा झाला तर पुढील काही महिन्यात काही निवडक कारखान्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर ती निश्चित लाभदायक ठरेल असे वाटते.

sugar stocks

आज भारतामध्ये साखर उद्योगात साधारणपणे 50 ते 60 छोट्या मोठ्या पब्लिक लिमिटेड कंपन्या आहेत. त्यातील 45 ते 50 साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये मुंबई शेअर बाजार व राष्ट्रीय शेअर बाजारांवरही मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्रीचे व्यवहार होत असल्याचे दिसते. गेल्या वर्षाचा साखरेचा गळित हंगाम एप्रिलच्या अखेरीस जवळजवळ संपला. मे- जून या महिन्यात साखरेचे उत्पादन होत नाही कारण त्यासाठी ऊस बाजारात उपलब्ध नसतो. यंदाही एप्रिल अखेरपर्यंत सहकारी व खाजगी साखर कारखाने सुरू राहिलेले होते. मात्र गुंतवणुकीच्या दृष्टीने विचार करता अनेक खाजगी साखर कारखान्यांनी साखरेच्या उत्पादनापेक्षा मूल्यवर्धित इथेनॉल निर्मिती, मद्य निर्मिती तसेच को जनरेशन म्हणजे वीज निर्मिती मध्ये गुंतवणूक करून त्यावर भर दिल्यामुळे त्यांच्या नफा क्षमतेमध्ये चांगली वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.

साखरेच्या बाजारभावांमध्ये होत असलेल्या चढ-उताराचा फायदा अनेक वेळा या खाजगी व पब्लिक लिमिटेड साखर कंपन्यांना चांगल्या पद्धतीने होतो. कारण पावसाळ्यानंतर जो सणासुदीचा हंगाम सुरू होतो त्यात म्हणजे विशेषतः दसरा दिवाळीच्या काळामध्ये देशातील साखरेचा खप व वापर मोठ्या प्रमाणावर वाढत असतो. त्याच प्रमाणे दुग्धजन्य पदार्थ व मिठाईसाठी साखरेचा वापर सातत्याने वाढत आहे. देशातील शीत पेये उद्योगांकडूनही साखरेची मागणी सतत वाढत असते. त्यामुळेच चांगल्या कंपन्यांच्या शेअर्सचा तपशीलवार अभ्यास केला व खालच्या बाजारभाव पातळीमध्ये त्यात गुंतवणुक केली तर अशी गुंतवणूक निश्चित लाभदायक ठरू शकते.

यातील आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे 2024 हे वर्ष सार्वत्रिक निवडणुकांचे म्हणजे लोकसभा आणि अनेक राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांचं आहे. त्यामुळे हा साखर उद्योग केंद्राच्या निर्यात तसेच इथेनॉल निर्मिती धोरणावर अवलंबून रहाणार आहे. त्याचा परिणाम साखर कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती कमी- जास्त होण्यावर निश्चित होतो. केंद्र सरकारने ऑक्टोबर 2023 अखेरपर्यंत 60 लाख टन साखर निर्यात करायची परवानगी दिलेली आहे आणि त्यात आणखी दहा लाख टनाची निर्यातीची वाढीव परवानगी मिळू शकते. अशी निर्यात वाढीची परवानगी मिळाली तर अनेक खाजगी कंपन्यांना त्याचा फायदा होऊन त्यांच्या नफ्यात वाढ होऊ शकते. त्यामुळे निर्यात करणाऱ्या साखर कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे जास्त हितकारक ठरू शकते. त्याचप्रमाणे 2022 मध्ये केंद्र सरकारच्या जीएसटी कौन्सिलने साखरेवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर आणला आहे. या उद्योगात गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने ही घटना हातभार लावणारी चांगली आर्थिक घटना आहे.

2021-22 या वर्षात 394 लाख टन साखर उत्पादन झालेले होते. त्या तुलनेत यंदा 311 लाख टन उत्पादन झाले आहे. म्हणजे यंदा साखर उत्पादन कमी झालेले आहे. या वर्षी इथेनॉल साठी 45 लाख टन साखर वापरली जाण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी त्यासाठी 34 लाख टन वापरली गेली होती. म्हणजे बाजारात साधारणपणे 200 लाख टनांपेक्षा जास्त साखर बाजारात उपलब्ध होऊ शकते. चालू वर्षात महाराष्ट्रात तसेच कर्नाटक मध्ये थोड़े कमी साखरेचे उत्पादन झाले आहे. मात्र उत्तर प्रदेशात साखर उत्पादन गेल्या वर्षी पेक्षा जास्त झालेले आहे. भारतीय साखर उत्पादक संघटनेचा ( ISMA) यांच्या अंदाजानुसार हे उत्पादन 340 लाख टनाच्या घरात जाऊ शकते. पण तशी शक्यता दिसत नाही.

साखर उद्योगांमध्ये गळित हंगाम व विक्रीचा काळ हंगाम हे वेगवेगळे आहेत. पब्लिक लिमिटेड कंपन्यांचे आर्थिक वर्ष एप्रिल 2022 ते मार्च 2023 असे आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या धोरणानुसार ज्या कारखान्यांनी त्यांची साखर उत्पादन कमी करून इथेनॉल साठी त्याचा वापर केला त्यांना शंभर टक्के अनुदान जाहीर केले आहे. यात ज्यादा साखर उत्पादन करण्यापेक्षा त्यापासून इथेनॉलउत्पादन निर्मितीवर तसेच वीज व मद्य निर्मितीवर काही कंपन्या भर देत आहे. उसाच्या रसापासून साखरेपेक्षा इथेनॉल तयार करणे हे अनेक कंपन्यांना फायदेशीर ठरत आहे. अशा कंपन्‍यांना नक्कीच जारत नफा मिळत आहे.

गुंतवणूकीच्या दृष्टीने श्री रेणुका शुगर, पॉनी शुगर, द्वारकेश शुगर, त्रिवेणी इंजीनियरिंग, ईआयडी पॅरो इंडिया, व बलरामपुर चीनी या कंपन्यांची चालू आर्थिक वर्षातील कामगिरी समाधानकारक असल्याने त्यांच्या शेअरमध्ये चांगली वाढ सध्या होत आहे. मात्र राजश्री शुगर व शक्ती शुगर यांच्यात अलीकडे थोडी घसरण झालेली आहे. यातील काही कंपन्यांचा आढावा पुढीलप्रमाणे-

श्री रेणुका शुगर कंपनीची आर्थिक कामगिरी चांगली सुधारलेली असून साखरेच्या जोडीलाच इथेनॉल, वीज व खत निर्मिती करत आहे. याशिवाय कंपनी मळीपासून डिस्टिलरी चालवत असून त्यातून वाहनांसाठी अल्कोहोल व इथेनॉल निर्मिती करत आहे. याशिवाय उसाच्या चौथ्या पासून हा कारखाना वीज निर्मिती करत असून त्यांना त्यात लक्षणीय फायदा होत आहे. त्याचप्रमाणे ही कंपनी कच्ची साखर, पांढरी साखर , कोळसा, मळी व अल्कोहोल यामध्ये व्यापार करते. सध्या या कंपनीच्या शेअरचा भाव 43.32 रुपयांच्या घरात आहे.(12 जुलै)या कंपनीचा गेल्या वर्षभरातील उच्चांकी भाव 68.70 रुपये होता तर नीच अंकी भाव पातळी 39.50 रुपये होती.

ईआयडी पॅरी इंडिया लिमिटेड ही कंपनी चेन्नई येथील असून गेली 225 वर्षे कार्यरत आहे. अत्यंत अनुभव संपन्न व लाभ भागधारकांना चांगला परतावा देणारी ही कंपनी आहे. साखरेचे उत्पादन आणि वितरण यामध्ये ही कंपनी अग्रगण्य आहे. या कंपनीच्या शेअरचा भाव 459.55 रुपयांच्या घरात आहे. त्यात सध्या घट होत आहे.या शेअरचा गेल्या वर्षातील सर्वोच्च भाव 673.30 रुपये तर किमान भाव 433 रुपये होता. त्यामुळे सध्याची किंमत खूप आकर्षक वाटते.

त्रिवेणी इंजीनियरिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी नायडस मधील असून 1932 मध्ये तिची स्थापना झालेली आहे. साखरेच्या उत्पादनाबरोबरच ही कंपनी इथेनॉल अल्कोहोल वीज निर्मिती वीज वितरण औद्योगिक क्षेत्रासाठी गिअरबॉक्सेस व पाणी शुद्ध करण्याचे तंत्रज्ञान व काही फास्ट मूवी कंजूमर प्रोडक्स या क्षेत्रात काम करते. देशातील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक साखर उत्पादन करणारी चांगली कंपनी आहे. या कंपनीच्या शेअरचा भाव 276.75 रुपये आहे. त्याचा गेल्या वर्षभरातील उच्चं की भाव 311.40 रुपये तर नीचांकी पातळी 215.55 रुपये होती.
.
बलरामपुर चीनी मिल्स ही कंपनी 1975 मध्ये स्थापन झालेले असून प्रामुख्याने साखर उत्पादन व विक्री यात अग्रगण्य आहे. याशिवाय कंपनी इथेनॉल चे उत्पादन व विक्री करते वीज निर्मिती करते आणि कृषी क्षेत्रासाठी लागणाऱ्या खतांची विक्रीही करते कंपनीची कंपनीचा उत्तर प्रदेशात दररोज 77 हजार 500 टन ऊस गाळप करण्याची क्षमता आहे. या कंपनीचा कंपनीच्या शेअरचा सध्याचा भाव 383.75 रुपये आहे.या शेअरने वर्षभरात 430.85 रुपयांची उच्चांकी तर 306.80 रुपयांची निचांकी नोंदवलेली आहे.

साखर उद्योगात सर्वाधिक वेगाने प्रगती करणारी कंपनी म्हणून दालमिया भारत शुगर कंपनीचा उल्लेख केला जातो. उत्तर प्रदेशातील रामगढ येथे ही कंपनी असून त्यांच्या कामगिरीवर एक लाख पेक्षा शेतकऱ्यांचा गाढा विश्वास आहे. कंपनीची प्रतिदिन अडीच हजार टन ऊस गाळप करण्याची क्षमता आहे. या कंपनीचा सध्याचा भाव 374 रुपये आहे तर गेल्या वर्षभरात त्याने 440.55 रुपयांची उच्चांकी व 310.50 रुपयांची नीचांकी पातळी नोंदवली होती.
भारतीय बाजारपेठांमध्ये साखर आणि साखरेचे भाव हे जरी सातत्याने ऐकावे खाणारे असले तरी साखर उद्योगाचा देशाच्या अर्थव्यवस्थेतील वाटा खूप महत्त्वपूर्ण आणि वाढता आहे. केंद्र सरकारने सहकारी साखर कारखाने व कंपन्यांना इथेनॉल निर्मितीसाठी प्रोत्साहन व आर्थिक सवलती दिल्यामुळे अनेक कंपन्या त्याचा लाभ घेत आहेत परिणामतः गुंतवणूकदारांना यामध्ये गुंतवणूक केल्याचा चांगला परतावा मिळत आहे. यावर्षी अशीच चांगली कामगिरी आणखी काही कंपन्यांची होईल अशी अपेक्षा आहे. त्यामध्ये बजाज हिंदुस्तान, रामपूर शुगर मिल्स, आणि द्वारिकेश शुगर मिल्स यांचाही अभ्यास करून गुंतवणुकीसाठी विचार करायला हरकत नाही.

*(लेखक अर्थविषयक जेष्ठ पत्रकार आहेत)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »